सॅन होजे: संपूर्ण अमेरिका आणि कॅनडामधील मराठी रसिकांच्या प्रचंड प्रतिसादात 'नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२५' कमालीचा यशस्वी ठरला. सॅन होजे येथील 'द कॅलिफोर्निया थिएटर' मध्ये अडीच हजारांहून अधिक प्रेक्षकांनी या तीन दिवसीय महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. नाफाचे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांनी या महोत्सवाला मनोरंजनाची दिवाळी असे संबोधले.
रेड कार्पेट, पुरस्कार आणि अमोल पालेकरांना जीवनगौरव
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भव्य आणि ग्लॅमरस रेड कार्पेटच्या साथीने 'फिल्म अवॉर्ड नाईट' पार पडली. महाराष्ट्रातून आलेल्या कलावंतांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना अत्यंत मानाचा "नाफा जीवन गौरव" पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सचिन खेडेकरांचे रोखठोक भाषण
दुसऱ्या दिवशी मुख्य चित्रपट महोत्सवाची सुरुवात अभिनेते सचिन खेडेकर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि गाजलेल्या भाषणाने झाली. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीची सध्याची अवस्था, मराठी चित्रपटांबद्दलची ओरड आणि मराठी चित्रपट न चालण्यामागे कोण जबाबदार आहे, अशा प्रश्नांचा वेध घेतला. गेल्या काही वर्षांतील मराठी चित्रपटांच्या अपयशाची कारणे त्यांनी आकडेवारीसह मांडली. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी 'नाफा'सारख्या संस्था कशा प्रकारे पुढाकार घेऊ शकतात आणि नेमके काय काम होणे आवश्यक आहे, याबद्दलही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
चित्रपट प्रदर्शन, 'मीट अँड ग्रीट' आणि कार्यशाळा
महोत्सवादरम्यान दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘स्नोफ्लॉवर’ या चित्रपटांचे स्क्रिनिंग करण्यात आले. सोबतच 'नाफा' निर्मित तीन शॉर्टफिल्म्सही प्रदर्शित करण्यात आल्या. सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी आणि वैदेही परशुरामी यांच्यासाठी आयोजित 'मीट अँड ग्रीट'ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अश्विनी भावे आणि अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित सत्रे घेतली, तर प्रसाद फणसे आणि रोहन फणसे यांनी डबिंगसंदर्भात खास वर्कशॉप घेतले. हे सर्व वर्कशॉप्स सहभागींसाठी अतिशय माहितीपूर्ण ठरले. विशेष म्हणजे, अमोल पालेकर यांचे आत्मचरित्र ‘ऐवज’ आणि त्याचे इंग्रजी भाषांतर ‘Viewfinder’ यांचे अमेरिकेत 'नाफा'च्या मंचावर प्रकाशन झाले. प्रकाशनानंतर विक्रम वाटवे यांनी अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांची मुलाखत घेतली, ज्यासाठी अमेरिकेचा क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकर खास उपस्थित होता.
अमेरिकन संसदेचे मानपत्र आणि पुरस्कार वितरण
'नाफा फिल्म फेस्टिव्हल'च्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात एका खास सन्मानाने झाली, जेव्हा अमेरिकेच्या संसदेने 'नाफा'ला दिलेले मानपत्र श्री ठाणेदार यांनी 'नाफा'च्या मंचावर अभिजीत घोलप यांना प्रदान केले. यानंतर तीन नव्या शॉर्टफिल्म्सचे स्क्रीनिंग झाले आणि आदल्या दिवशी दाखवलेल्या तीन शॉर्टफिल्म्सचे दिग्दर्शक श्रीमिरजकर (योगायोग), हर्ष महाडेश्वर (सबमिशन), संदीप करंजकर (द गर्ल विथ रेड हॅट) यांच्यासोबत डॉ. गौरी घोलप यांनी संवाद साधला.
विद्यार्थी सहाय्यक (स्टूडंट सपोर्टिंग) विभागातील शॉर्ट फिल्म्सनाही यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये बेस्ट शॉर्टफिल्म (डम्पयार्ड), दुर्वा नांदापूरकर (बेस्ट स्क्रीन प्ले - भंगी), भूषण पाल (बेस्ट सिनेमॅटोग्राफी - डम्पयार्ड), रुचिर कुलकर्णी (बेस्ट एडिटिंग - चेंजिंग रूम), प्रफुल्ला खारकर (विशेष उल्लेखनीय - बिर्याणी) आणि गार्गी खोडे (विशेष उल्लेखनीय - सबमिशन) यांचा समावेश होता.
मास्टरक्लासेस आणि पॅनल डिस्कशन
त्यानंतर अनिल भालेराव दिग्दर्शित 'छबिला' आणि निखिल महाजन दिग्दर्शित ‘रावसाहेब’ या चित्रपटांचे स्क्रीनिंग झाले. सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी, सचिन खेडेकर, डॉ. मोहन आगाशे यांच्या मास्टरक्लासेसला रसिक प्रेक्षकांनी सखोल दाद दिली.
मराठी सिनेमा – वर्तमान, भवितव्य आणि वाटचाल या विषयावर झालेल्या पॅनल डिस्कशनमध्ये मधुर भांडारकर, अवधूत गुप्ते, डॉ. मोहन आगाशे, गजेंद्र अहिरे, स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि आदिनाथ कोठारे यांनी आपली मते मांडली. या पॅनल डिस्कशनचे सूत्रसंचालन वैदेही परशुरामी हिने केले.
पुढील वाटचाल आणि व्यापक पोहोच
क्लोजिंग सेरेमनीच्या वेळी नाफा अध्यक्ष अभिजीत घोलप, अर्चना सराफ, रिया ठोसर, अनुप निमकर, लक्ष्मण आपटे, वृषाली मालपेकर, मानसी देवळेकर आणि इतर सर्व नाफा सदस्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. अभिजीत घोलप यांनी पुढील वर्षीच्या 'नाफा'मध्ये काय नवीन असेल, कोणते नवे देश गाठायचे आहेत आणि या उपक्रमाचे पुढचे पाऊल काय असावे, याविषयी माहिती दिली. या भव्य आयोजनामुळे अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांचा मनसोक्त आनंद घेतला आणि पुढील वर्षी नव्या उत्साहात, तसेच अधिक देशांमध्ये 'नाफा' कार्यरत करण्याचा संकल्प करण्यात आला.