कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेने सकाळी कामाला जाणाऱ्या लोकांचे फारसे हाल झाले नाही. रेल्वे रुळाला तडे गेल्यानं लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यामुळे कर्जतकडे जाणाऱ्या लोकल काही वेळांसाठी विस्कळीत झाल्या होत्या, मात्र आता रेल्वे सेवा सुरुळीत सुरू झाल्याचे रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यानी सांगितले आहे.
कर्जत बदलापूर लोकल सेवा सुरळीत
मुंबई उपनगरीय लोकल सेवेला जीवनवाहिनी म्हटलं जातं. दररोज लाखो लोक मुंबईत ट्रेनने प्रवास करतात. मध्य रेल्वे मार्गावर बिघाड आता प्रवाशांसाठी नेहमीचाच झालाय. आज देखील अनेक मुंबईकरांना याची प्रचिती आली. वांगणी-बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे कर्जत-बदलापूर दरम्यानची अप-डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रवाशांच्या ऐन कामावर जाण्याच्या वेळी ही लोकल वाहतूक ठप्प झाल्यामुळे नोकरदारांना बराच वेळ रेल्वे स्थानकांवर गाडीची वाट पाहत उभे राहावे लागले. दररोज कर्जत-बदलापूरवरुन मोठ्या संख्येने प्रवासी नोकरीसाठी मुंबईत येत असतात. त्यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या लोकांची रेल्वे स्थानकांवर गर्दी वाढत चालली होती. मात्र आता रेल्वे प्रशासने रेल्वे रूळ दुरुस्त करत लोकल सेवा सुरळीत केली आहे.
प्रवाशांची मोठी गर्दी
पहाटे ६:४० च्या सुमारास बदलापूर ते वांगणी स्टेशन दरम्यान डाऊन लाईनवर रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे डाऊन लाईन पूर्णपणे बंद झाल्याची माहिती आहे. रुळाला तडा गेल्याने कल्याण ते सीएसएमटी आणि कर्जत-खोपोली मार्गावरील लोकल गाड्या खोळंबल्या. या बिघाडामुळे बदलापूर ते कर्जत दरम्यानच्या स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरु केलं आहे.