नांदेड : नांदेड शहरात आज दुपारी एक भीषण हिट अँड रन अपघात घडला, ज्यामध्ये एका मद्यधुंद कारचालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक दुचाकीस्वार आणि एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाले आहेत, तर इतर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात नांदेड शहरातील भाग्यनगर कॉर्नरजवळ घडला.
भरधाव वेगाने आलेल्या एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन ऑटो रिक्षा, एक मारुती कार, एक बुलेट आणि इतर काही दुचाकींना अक्षरशः उडवले. हा थरार पाहून आजूबाजूच्या नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, दोघांची प्रकृती गंभीर आहे.
अपघातात बुलेट चालक आणि एका ऑटो रिक्षाचालकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले होते. त्यामुळेच हा अपघात घडला, ज्यात अनेकजण थोडक्यात बचावले.
घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.