नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू झाले आहे. पण विरोधकांच्या गदारोळामुळे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचे बरेचसे कामकाज वाया गेले. केंद्र सरकारने कामकाजाच्या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार लोकसभेत आज म्हणजेच सोमवार २८ जुलै रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सलग १६ तास ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या चर्चेची सुरुवात करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह सत्ताधाऱ्यांकडून अनेक दिग्गज चर्चेत सहभागी होणार आहेत. विरोधकांचे प्रमुख नेते या चर्चेत सहभागी होतील. चर्चेच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपांची रणधुमाळी उडण्याची शक्यता आहे.
जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. याला उत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर केले. भारताने पाकिस्तानमधील नऊ अतिरेकी तळ नष्ट केले. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या या प्रयत्नाला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील ११ हवाई तळांवर हल्ला केला. भारताच्या या ऑपरेशन सिंदूर बाबत आधी लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत चर्चा होणार आहे. दोन्ही सभागृहात प्रत्येकी १६ तास चर्चा होणार आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना उलटसुलट प्रश्न विचारुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत तर सत्ताधारी ऑपरेशन सिंदूरचं यश सभागृहात सांगतील.
मी मध्यस्ती केली म्हणून भारत - पाकिस्तान दरम्यानच्या संघर्ष टळला, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प सातत्याने करत आहेत. हा दावा भारताने सपशेल नाकारला आहे. पाकिस्तानच्या डीजीएमओकडून फोन आला, त्यांनी भारताला लष्करी कारवाई थांबवण्याची विनंती केली आणि या विनंतीला भारताने प्रतिसाद दिला; असे भारताने सांगितले. पण विरोधक ट्रम्प यांच्या मध्यस्तीमुळेच पाकिस्तान विरुद्धची कारवाई थांबवण्यात आल्याचा आरोप करत आहेत.