मुंबई : सहकलाकाराच्या भूमिकेतून मुख्य कलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर वावरणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न पूर्ण झालं आहे मराठमोळी अभिनेत्री अश्विनी बागल हिचं. अभिनयाच्या जोरावर अश्विनी आता नव्याकोऱ्या आगामी ‘नवारंभ’ या चित्रपटातून मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अश्विनीचा आता सिनेविश्वातील मुख्य प्रवास सुरु झाला आहे. यापूर्वी अश्विनीने अनेक चित्रपट, हिंदी-मराठी म्युझिक अल्बममधून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
‘रावरंभा’, ‘भिरकीट’, ‘का रे देवा’ या चित्रपटांमधून अश्विनी मोठ्या पडद्यावर झळकली. मात्र अश्विनीला 'नवारंभ' या चित्रपटाने मुख्य भूमिकेची संधी देत तिच्या अभिनयाची वाट मोकळी करुन दिली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. या चित्रपटात अश्विनी ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे अश्विनीच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. गावाच्या विकासासाठी तरुण वर्गाने पुढाकार घेत ऐक्याने काम करणं हा या चित्रपटाचा उद्देश्य आहे. सामाजिक एकता, सर्वधर्म समभाव असा हा चित्रपट आहे.
अर्थात सयाजी शिंदे यांच्याबरोबर अश्विनीला स्क्रीन शेअर करायला मिळणं आणि त्यात मुख्य भूमिका असणं म्हणजे सोन्याहून पिवळं. निर्माते मयूर शाह यांची निर्मिती असलेला हा चित्रपट दिग्दर्शक संजय देवकर दिग्दर्शित आहे. अश्विनीने चित्रपटाचा अनुभव शेअर करत असं म्हटलं आहे की, "सर्वात प्रथम मला 'नवारंभ' या आशयघन चित्रपटात मुख्य भूमिका साकारायला मिळाली यासाठी मी सर्वांची ऋणी आहे. आणि अभिनेते सयाजी शिंदेंसह चित्रपटात स्क्रीन शेअर करायला मिळाली हे माझं भाग्य आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्याकडून अभिनयाचे धडे मिळाले, इतरही कलाकारांकडून खूप काही शिकायला मिळालं. लवकरच ग्रामीण विकासावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल".