लोणावळा : थंड हवेसाठी प्रसिद्ध आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या लोणावळ्यात धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याने घरी निघालेल्या तरुणीला तीन अज्ञात नराधमांनी त्यांच्या कारमध्ये ओढून बसवले आणि कार लोणावळ्यातील तुंगार्ली गावच्या हद्दीतील एका निर्जनस्थळी नेली. तिथे कारमध्येच नराधमांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी तीन अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
लोणावळा परिसरातील २३ वर्षांच्या तरुणीने तक्रार दिली आहे. तरुणीच्या फिर्यादीनुसार पीडित तरुणी ही शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास लोणावळ्यातील तुंगार्ली गावाच्या हद्दीतील एका रस्त्याने जात असताना कारमधून आलेल्या तीन तरुणांनी तिचे तोंड दाबून जबरदस्तीने कारमध्ये ओढून बसवले. त्यानंतर त्यांनी तिचे हात मागे बांधून तिचा मोबाईल काढून घेतला. यानंतर तरुणीला विवस्त्र केले. हाताने मारहाण करत चालत्या कारमध्ये तसेच काही ठिकाणी कार थांबवत शुक्रवारी रात्री नऊ ते शनिवारी पहाटेपर्यंत आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर नराधमांनी तिला कारमधूनच नांगरगाव येथील रस्त्याच्या कडेला टाकून दिले. यानंतर नराधम कार घेऊन पळून गेले.
पोलिसांनी तरुणीची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर तातडीने कारवाई सुरू केली. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीआधारे तपास करुन पोलिसांनी अवघ्या काही तासांत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. संशयिताची चौकशी सुरू आहे.