कोकण आयकॉन : सतीश पाटणकर
थोर परंपरा लाभलेल्या कोकणच्या लाल मातीत राहून इथल्या नाजूक आणि ओल्या मातीला आकार देणाऱ्या कलाकारांमध्ये एस. बी. पोलाजी यांचे अग्रक्रमाने नाव घ्यावे लागेल. सावंतवाडी तालुक्यातील वाफोली या छोट्याशा आडवळणाच्या गावात राहून अखंडपणे आणि नि:स्वार्थी वृत्तीने चित्रकारांची पिढी घडविण्याचे काम ते करीत आहेत. गेली दोन-अडीच तपे त्यांचे हे कार्य अखंडितपणे सुरू आहे. दर रविवारी त्यांच्या राहत्या घरात चित्रकारांची शाळा भरते. गोवा आणि कोकणातून अगदी पाच वर्षांपासून ते पंधरा - वीस वर्षे वयाचे नवोदित चित्रकार त्यांच्याकडे सुट्टी आणि रविवारी येत असतात. पोलाजी सर आपली सर्व कामे बाजूला सारून या कलाकारांना विविध माध्यमांतून पेंटिंग्स कशी करायची याचे धडे देत असतात. पोलाजी सरांनी आज वयाची पंच्याहत्तरी गाठली आहे. तरी सुद्धा त्यांची उमेद तरुणांना लाजवणारी आहे.
वाफोली ग्रामपंचायतीच्या शेजारी असलेले त्यांचे घर म्हणजे एक दीपस्तंभ आहे. पोलाजी सरांचा शिष्य मिलिंद तर्पे यात हिरीरीने सहभागी होतो. त्यांचे घर म्हणजे मुलांना स्वतःचे घर वाटते. यात जिव्हाळा आणि प्रेम ऊतू झाल्याचे चित्र पाहायला मिळते. पोलाजी सरांना आर्थिक व्यवहार कधी समजलेलाच नाही. घरी येणाऱ्या बालकलाकारांना खाऊ घालणे आणि त्यांच्याकडून उत्तमोत्तम चित्रे करून घेणे एवढे एकच ध्येय त्यांच्यासमोर असते. यासाठी ते कोणाकडूनही एक पैसा घेत नाहीत. मात्र चित्रकलेचे प्रदर्शन असताना जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती आणि कलारसिक हे प्रदर्शन भरविण्यासाठी लागणाऱ्या शुभेच्छापूर्वक मदतीचा हात त्यांना देतात.
सर चित्रकार म्हणून दिग्गज आहेतच पण त्याहीपेक्षा ते माणूस म्हणून अधिक श्रेष्ठ आहेत. त्यांच्या माणूसपणाच्या गोष्टी सांगणारे चित्रकारच नव्हे, तर रसिक आणि सामान्यजन केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेरही सहज भेटतील. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वागायला अतिशय साधेपणा.आपण देशातील एक मोठे कलाकार असल्याचा बडेजाव कुठेही नाही. हळुवार बोलणे, एखाद्या चित्रातली चूक दाखवताना समोरच्या विद्यार्थ्याला ते अतिशय आदरपूर्वकच त्याच्याशी बोलून त्याला ती चूक दाखवितात. सर संवाद साधत असताना सर आणि समोरची व्यक्ती या दोघांमधील वयाचे अंतर पूर्णपणे बाजूला होते. त्यांच्या या गुणांमुळेच ते केवळ जवळचेच नव्हे तर अगदी आपल्या घरातील व्यक्तीप्रमाणे वाटतात. वय हा त्यांच्या कोषात मुद्दाच नाही. या वयात एवढं कसं जमवता? असा प्रश्न कुणी विचारला तर ते सांगतात कोकणच्या निसर्गात एवढी ऊर्जा आहे, की आपण घेऊ तेवढे कमीच. मी भरपूर हिंडतो, फिरतो या फिरतीमध्येच ऊर्जा देखील गोळा करतो. आवश्यक तेवढी वापरतो. अनेकदा मी चित्रकारांना सांगतो, अगदी व्यायाम करू नका पण हिंडते फिरते राहा. तो तुमचा व्यायाम आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी डोक्याचा आणि हाताच्या बोटांचा व्यायाम मात्र केलाच पाहिजे. सततची रेखाटने, रेखाचित्रे आणि चित्रे जी केवळ सराव म्हणून केलेली असतात. तोच त्यांचा खरा व्यायाम. चित्र बोटाने नाही काढले जात त्यात डोक्याचा वापर महत्त्वाचा असतो. रेखाटने काढताना हाताची बोटे आणि मेंदू दोन्ही गोष्टी वापरल्या जातात आणि त्याचा आपसुकच व्यायाम होतो.
देशात आणि परदेशात चित्र आणि रंगावली प्रदर्शने :
‘आधी केले आणि मग सांगितले’ हा खाक्या पोलाजी सर नेहमीच पाळत आलेले आहेत. ते आजही नेमाने सराव म्हणून रेखाटने करतात. खरे तर हल्लीच्या आर्ट स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी हे उदाहरण खूप महत्त्वाचे आहे. पोलाजी यांनी आतापर्यंत परदेशात आपल्या शिष्यांची २६, तर संपूर्ण भारतात ५० हून अधिक परदेशात चित्र आणि रंगावली प्रदर्शने भरविली आहेत. सन २०१८ च्या गणेशोत्सवात अमेरिकेत त्यांच्या एका चाहत्याने त्यांना गणेशमूर्ती करण्याचे निमंत्रण दिले. सरांनी ते ताबडतोब स्वीकारले आणि अमेरिकेत पंधरा दिवस राहून गणेशमूर्ती साकारली. त्यांचा हा उत्साह तरुणांना लाजविणारा असाच आहे.
दीपावली २०१८ च्या सुट्टीच्या काळात कोकण आणि गोव्यातील आठ कलाकारांना घेऊन त्यांनी भारताच्या राजधानीत रंगावली, चित्र व छायाचित्रांचे सात दिवसांचे प्रदर्शन भरविले. या प्रदर्शनाचे उदघाट्न ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते झाले. जगातील सर्वात उंच असलेल्या सरदार वल्लभाई पटेल यांचा गुजरातमध्ये पुतळा उभारणारे जागतिक कीर्तीचे मूर्तिकार राम सुतार यांनी पोलाजी सरांच्या या प्रदर्शनाला भेट देऊन त्यांना आशीर्वाद दिले. वयाच्या ९४ व्या वर्षी पंचाहत्तरीतील कलाकाराचे देशाच्या राजधानीत कौतुक होते, ही फार मोठी घटना आहे. या प्रदर्शनात कोकण आणि गोव्यातील अक्षय सावंत, सिद्धेश धुरी, तन्मेश परब, मिलींद तर्पे, अमेय कोरगावकर, अनिल भिसे, ऋतिका पालकर आणि आयुष दत्तप्रसाद पाटणकर हेही सहभागी झाले. नॅशनल सोसायटीच्या क्लीन सिटीचे संचालक म्हणून सरांनी काम केले. अपंग विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे देण्याच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. त्यांच्या सुमारे २०० शिष्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके मिळाली आहेत. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी, नीलम संजीव रेड्डी, ग्यानी झैलसिंग, आर. वेंकटरामन, तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय अनेकांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी देशात आणि देशाबाहेर अनेक चित्र प्रदर्शने भरवून इथल्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. सरांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले. सरांनी किती चित्र प्रदर्शने भरविली आणि प्रत्यक्ष किती चित्र कार्यशाळा भरविल्या याची गणतीच नाही.बांद्यापासून चांद्यापर्यंत, मुंबईपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून अमेरिका, युरोपातील शहरापर्यंत जाऊन त्यांनी भारतीय चित्रकला पोहोचविली. पोलाजींची महती देशाच्या सीमा ओलांडून चहुदिशांना पोहोचली आहे. असा हा अवलिया आजही आपल्या गावात राहून बालकलाकारांची चित्रशाळा भरवितो, याचे अप्रुप वाटते.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)