निवेदिता सराफ आणि गिरीश ओक पुन्हा एकत्र!
मुंबई : गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित, तसेच तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत 'बिन लग्नाची गोष्ट' या आगा मी चित्रपटाचे हटके पोस्टर्स सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या फ्रेश जोडीचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले होते आणि त्याची चर्चा अजूनही सुरू असतानाच, आता या चित्रपटाचे दुसरे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या नवीन पोस्टरनेही प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण केले आहे.
निवेदिता सराफ आणि गिरीश ओक ही लोकप्रिय जोडी या दुसऱ्या मोशन पोस्टरमध्ये एका गंमतीशीर अंदाजात दिसत आहे. पोस्टरमध्ये निवेदिता सराफ सोफ्यावर बसलेल्या असून त्यांच्या डोक्यावर मुंडावळ्या आहेत. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावर नववधूसारखी लाजरी भावमुद्रा नसून एक मिश्किल शांतता आहे. त्यांच्यामागे गिरीश ओक अत्यंत आनंदी चेहऱ्याने हात दाखवून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दृश्य पाहता हे पारंपारिक जोडपे नसले तरी, त्यांचे नाते मात्र निश्चितच घट्ट असल्याचे दिसते.
दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी चित्रपटाविषयी बोलताना सांगितले की, "आजच्या पिढीला नात्यांबद्दल स्पष्टता असली तरी लग्नाविषयी त्यांच्या मनात अनेकदा गोंधळ असतो. काही वेळा प्रेम, मैत्री आणि जबाबदारी हे सर्व लग्नाच्या साच्यात न बसताही एक सुंदर नाते निर्माण करतात. 'बिन लग्नाची गोष्ट' हे त्याचेच एक हलकेफुलके पण अर्थपूर्ण प्रतिबिंब आहे. निवेदिता सराफ, गिरीश ओक, प्रिया बापट, उमेश कामत हे चारही कलाकार जबरदस्त आहेत. त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळे ही गोष्ट अधिक जिवंत झाली आहे."
निर्माते नितीन वैद्य म्हणाले, "आजची तरुण पिढी नात्यांकडे वेगळ्या दृष्टीने बघते. हे चित्रपटातून दाखवताना आम्ही विनोदाची किनार कायम ठेवली आहे. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना ही गोष्ट आपलीशी वाटेल. हलक्याफुलक्या मांडणीतून ही कथा प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजेल, याची आम्हाला खात्री आहे."
या चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुनील बियानी, पवन मेहता आणि नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत.