मुंबई : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाला आहे. मालिकेत सुरू असलेल्या वात्सल्य आश्रमातील विलासच्या खून प्रकरणाच्या कोर्ट केसचा निकाल येत्या 30 जुलै रोजी लागणार असल्याने, ही मालिका संपणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. मात्र, मालिकेतील प्रमुख कलाकारांनी व्हिडीओद्वारे या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
कोर्ट केस संपणार, पण मालिका नाही!
याबाबत खुद्द अर्जुन सुभेदार म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीने स्पष्टीकरण दिले आहे. स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये अमित भानुशालीने सांगितले की, "बऱ्याच लोकांनी असे विचारले की, कोर्ट केस संपणार आहे तर मालिकाही संपतेय की काय? तर, असं अजिबात नाही आहे! मालिका संपत नाहीये, फक्त मधुभाऊंची जी केस आहे, ती संपणार."
तो पुढे म्हणाला की, "अडीच-पावणे तीन वर्ष लागली या कोर्ट केसला संपायला... पण यानंतरही बरंच काही बाकी आहे." भानुशालीने स्पष्ट केले की, खरी तन्वी कोण आहे, सायलीच खरी तन्वी आहे का आणि नागराज-महिपत यांच्या केससुद्धा आहेत. त्यामुळे अर्जुन सुभेदार पुन्हा एकदा कोर्टात वकिलाच्या वेशात दिसणार आहे. "तुमचं इतकं प्रेम आहे, इतकी माया आहे की, शो कधीच संपणार नाही," असे म्हणत त्याने प्रेक्षकांना आश्वस्त केले.
काय आहे सध्याचा 'ठरलं तर मग' मालिकेतील पेच?
'ठरलं तर मग' मालिकेमध्ये सध्या वात्सल्य आश्रमात जानेवारी 2023 मध्ये घडलेल्या विलासच्या खून प्रकरणाचा निकाल लागणार आहे. या प्रकरणात अर्जुन सुभेदार आणि दामिनी देशमुख हे दोन प्रमुख वकील आमनेसामने आहेत. साक्षी, प्रिया आणि महिपत या त्रिकुटाचा खोटेपणा उघडकीस आणून मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी अर्जुन अथक प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, दामिनीला कोणत्याही मार्गाने साक्षीला वाचवायचे आहे. आतापर्यंतच्या एपिसोड्स आणि प्रोमोवरून हे जवळपास निश्चित झाले आहे की, निकाल मधुभाऊंच्या बाजूने लागेल.
अर्जुनसह मालिकेतील प्रताप, चैतन्य आणि अस्मिता यांसारख्या इतर कलाकारांनीही 'ठरलं तर मग' मालिका संपणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला असून, या व्हिडिओंवर मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामुळे, प्रेक्षकांना आता पुढील भागांमध्ये काय रहस्य उलगडणार याची उत्सुकता लागली आहे.