द्रास सैन्य स्मारकातील 'लाईट अॅण्ड साऊंड शो' साठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार
मुंबई : कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी ज्या त्वेषाने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने शत्रूशी लढा दिला, त्या लढाईचा थरार आता इथे भेट देणाऱ्या प्रत्येक भारतीय पर्यटकाला प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. जून महिन्यात भारतीय लष्कर आणि सरहद संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कारगिल युध्द विजय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सरहद शौर्यथॉन-२०२५ (मॅरेथॉन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने द्रास युद्ध स्मारकाला भेट देणार्या पर्यटकांसाठी रूपये ३ कोटी खर्च करून 'लाईट अॅण्ड साऊंड शो' सुरु करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. याच लाईट अँड साऊंड शोची निर्मिती आता भारतीय लष्कराने सुरू केली आहे.
या 'लाईट अँड साऊंड शो' ची निर्मिती करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने २२ जून २०२५ रोजी ३ कोटी रूपये भारतीय सैन दलाकडे हस्तांतरित केले होते. कारगिल सारख्या भौगोलिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आणि दुर्गम क्षेत्रात पार पडलेल्या या युद्धात सैनिकांना येणार्या अडचणी सर्वसामान्य लोकांना कळव्यात यासाठी हा शो तयार केला जाणार आहे. सैन्य दलाकडून हा शो सुरू करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे.
यासोबतच स्थानिक जिल्हा रूग्णालयाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या वतीने २६ व्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने सिटी स्कॅन मशीन आणि काही वैद्यकीय उपकरणे देण्याचा निर्णय घेतला आहे. सरहद संस्थेच्या वतीने संजय नहार यांनी ही माहिती दिली आहे.