नवी दिल्ली : लोकसभेत चांगली कामगिरी करणाऱ्या विविध पक्षांच्या १७ खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. तसेच संसदेत सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या चार जणांना विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाले आहेत. भर्तृहरी महताब (भाजप, ओडिशा), एनके प्रेमचंद्रन (क्रांतिकारी समाजवादी पक्ष, केरळ), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, महाराष्ट्र) आणि श्रीरंग अप्पा बारणे (शिवसेना, महाराष्ट्र) यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या सर्वांनी १६ व्या लोकसभेपासून सर्वोत्तम कामगिरी कायम ठेवली आहे.
संसदेत उत्तम कामगिरी करणाऱ्या रवी किशन (भाजप), निशिकांत दुबे (भाजप), स्मिता उदय वाघ (भाजप), मेधा कुलकर्णी (भाजप), प्रवीण पटेल (भाजप), विद्युत बरन महतो (भाजप) आणि दिलीप सैकिया (भाजप), अरविंद सावंत (शिउबाठा), , नरेश म्हस्के (शिवसेना), वर्षा गायकवाड (काँग्रेस) यांना संसदरत्न पुरस्कार देण्यात येणार आहेत.
समिती श्रेणीमध्ये, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालील वित्त स्थायी समिती आणि डॉ. चरणजित सिंग चन्नी (काँग्रेस) यांच्या अध्यक्षतेखालील कृषी स्थायी समितीला त्यांच्या अहवालांच्या गुणवत्तेसाठी आणि कायदेविषयक देखरेखीतील योगदानासाठी सन्मानित केले जाईल.
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै २०२५ पासून सुरू आहे. पण विरोधकांच्या गदारोळामुळे पहिल्या आठवड्याचा बराच वेळ वाया गेला आहे. आता पुढच्या आठवड्यात संसदेत ऑपरेशन सिंदूरवर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा नियोजीत आहे. या चर्चेवेळी काय घडते याकडे अनेकांचे लक्ष आहे.