नाशिक : आजपासून सुरू डोणाऱ्या श्रावणमासासाठी त्र्यंबकेश्वर सज्ज झाले आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थानाने भाविकांच्या सुविधांसाठी मंदिर सोळा तास उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. श्रावण सोमवारी मात्र सतरा तास दर्शनासाठी मंदिर उघडे राहणार आहे. दर्शनासाठी उडणारी झुंबड व तासन्तास करावी लागणारी प्रतिक्षा पाहता विश्वस्त मंडळाने गर्भगृहातील दर्शनावर मात्र सर्वांना बंदी घातली आहे.
श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने श्रावण महिन्यात भाविकांना पूर्व दरवाजा येथे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी वातानुकूलीत दर्शन बारीची व्यवस्था केली असून, यामुळे हजारो भाविक याठिकाणी दर्शनासाठी उभे राहू शकतील. तसेच दर्शन रांगेत जेष्ठ मंडळींना बसण्यासाठी व्यवस्था, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, पिण्याचे शुध्द पाण्याची व्यवस्था तसेच प्राथमिक आरोग्य कक्ष तयार करण्यात आलेला आहे. या शिवाय संपूर्ण महिनाभर श्री त्र्यंबकेश्वर मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी उघडण्याची वेळ ही पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत राहील तर श्रावण सोमवारी मंदिर पहाटे चार वाजता उघडून रात्री नऊ वाजता बंद करण्यात येणार आहे.
गावकऱ्यांना दर्शनासाठी सकाळी मंदिर उघडल्यापासून दहा वाजेपर्यंत व सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत राहील. गावकऱ्यांना मात्र दर्शनास येताना स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा म्हणून ओळखपत्र आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांना उत्तर महाद्वारातून प्रवेश दिल जाईल. तसेच दर्शनासाठी मंदिरात गावकऱ्यांना मंदिराच्या उत्तर दरवाजा म्हणजेच जाळीगेटने प्रवेश देण्यात येणार आहे. धर्मदर्शन रांग पूर्व दरवाजा व देणगी दर्शन रांग उत्तर दरवाजा येथून राहणार असल्याचेही देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाने म्हटले आहे.
कपलेश्वराचे मंदिर देखील उशिरापर्यंत उघडे राहणार
श्रावण महिना सुरू झाल्यानंतर नाशिक मधील कपालेश्वराचे मंदिर देखील पहाटे चार ते रात्री बारा वाजेपर्यंत सोमवार आणि शनिवारी खुले राहणार आहे अशी माहिती प्रशासक विलास पाटील यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे की, पहिल्या श्रावणी सोमवारी 21 पती-पत्नी एकत्र बसून सत्य शंकराची पूजा करणार आहे. भाविकांची एकूणच गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे