तलासरी : मुंबई-अहमदाबाद महामार्गांवर अनेक गुजराती मारवाडी लोकांचे हॉटेल असून या हॉटेलच्या मालकांनी आपल्या हॉटेल वरील पाट्या या गुजराती भाषेत लावल्या आहेत. त्या पाट्या पाहून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मराठी भाषेचा अवमान होत असल्याचा आरोप करत त्यांनी या पाट्यांची तोडफोड केली. या हॉटेल चालकांनी आपल्या हॉटेलच्या पाट्या मराठीत लावाव्यात असा इशारा दिला गेला. दरम्यान शांतता व एकोपा राहण्यासाठी शुक्रवारी सकाळी या हॉटेल चालकांना तसेच मनसे कार्यकर्त्यांना तलासरी पोलीस स्टेशनला बोलावून सामंजस्य घडवून आणले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी सदर बैठकीमध्ये मनसे पदाधिकारी यांनी गुजराती पाट्या असलेले हॉटेल यांनी सात दिवसांमध्ये मराठी पाट्या लावण्यात यावे, तसेच मेनू कार्ड मराठी मध्ये ठेवावेत, हॉटेलमध्ये काम करणारे कामगार यांनी मराठीत बोलले पाहिजे याबाबत सांगितले. यावेळी तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी हॉटेल मालक व चालक यांना मराठी पाटी, मराठी भाषा, मेनू कार्ड, याबाबत सूचना दिल्या तसेच मनसे पदाधिकारी यांना कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत तसेच प्रशासनास सहकार्य करावे असे सांगितले.