मुंबई : मुंबईच्या अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये परदेशी नागरिकांचा समावेश असलेल्या हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून ३ व्हिएतनामी महिलांची सुटका केली.
यासंदर्भातील माहितीनुसार, अंधेरी-कुर्ला रोडवरील टाइम्स स्क्वेअरजवळील एम्पायर सूट हॉटेलमधून हे बेकायदेशीर रॅकेट चालवले जात असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहितीची पडताळणी करून त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून एका व्यक्तीला अटक केली आणि तीन व्हिएतनामी महिलांची सुटका केली, ज्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले.
याप्रकरणी या महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी मॅनेजर या महिलांचे फोटो ग्राहकांना ऑनलाइन शेअर करायचा आणि नंतर त्यांना हॉटेलमध्ये पाठवून द्यायचा, असे महिलांनी पोलिसांत माहिती दिली. पोलीस अधिक तपास करीत आहे.