जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात आज, शुक्रवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भूसुरुंग स्फोटात भारतीय सैन्यातील एका अग्निवीराला वीरमरण आले. तर २ जवान जखमी झाले. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये एरिया डॉमिनन्स पेट्रोलिंगदरम्यान, हा स्फोट झाला. पाकिस्तानातील जिहादी दहशतवादी संघटना टीआरएफने या स्फोटाची जबाबदारी घेतली आहे.
या स्फोटाबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार हवेली तालुक्यातील सलोत्री गावामध्ये व्हिक्टर पोस्टजवळ भारतीय लष्करातील जाट रेजिमेंटचे नायब सुभेदार हरि राम, हवालदार गजेंद्र सिंह आणि अग्निवीर ललित कुमार हे आघाडीच्या चौक्यांजवळून गस्त घालत असताना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला.
या स्फोटात ललित कुमार यांना वीरमरण आले. तर हवालदार गजेंद्र सिंह आणि सुभेदार हरिराम हे गंभीर जखणी झाले आहेत. जखमी जवानांना एअरलिफ्ट करून उपचारांसाठी उधमपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, व्हाइट नाईट कोअरने हुतात्मा जवानाला श्रद्धांजली अर्पण केली आहे.