पुणे: पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातील आंबेगाव येथे घडली आहे. पत्नीवर संशय घेऊन तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी पतीने स्वतःच्याच घरात आणि बाथरूममध्ये स्पाय कॅमेरे बसविले. पत्नीचे आंघोळ करतानाचे आणि इतर खासगी व्हिडीओ चित्रीत करून ते व्हायरल करण्याची धमकी तिला दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे, पीडित पत्नीदेखील क्लास १ अधिकारी आहे. त्यामुळे अशाप्रकारे पती आणि पत्नी दोघेही प्रशासकीय सेवेत असूनही, हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पत्नीवर संशय होता म्हणून, या अधिकाऱ्याने घरात स्पाय कॅमेरे लावून पत्नीचे खाजगी क्षण रेकॉर्ड केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. आपल्या पतीसह तिने सासरच्या काही लोकांविरुद्ध छळ, ब्लॅकमेल आणि हुंडा मागितल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे.
सरकारी अधिकाऱ्यावर पत्नीचा गंभीर आरोप
पीडित पत्नी जीदेखील क्लास १ अधिकारी आहे, तिने आंबेगाव पोलिस ठाण्यात पती आणि त्याच्या कुटुंबातील सात सदस्यांवर छळ, ब्लॅकमेल आणि गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याचे २०२० मध्ये लग्न झाले. काही वर्षांनी, पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला, ज्यामुळे तो तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागला. तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी, त्याने घरात स्पाय कॅमेरे लावले होते. कामाच्या वेळीही तो तिच्या हालचालींवर लक्ष ठेवत असे. तक्रारीत पुढे म्हटले आहे की, आरोपीने वारंवार धमकी दिली होती की जर तिने तिच्या पालकांच्या घरातून कार आणि गृहकर्जाचे हप्ते भरण्यासाठी १.५ लाख रुपये आणले नाहीत तर तो तिचे खाजगी व्हिडिओ ऑनलाइन लीक करेल.
महिलेने तिच्या सासू, सासरे, मेहुणे, आणि इतर नातलगांवर देखील आरोप केले आहे. लग्न झाल्यापासून सतत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सासरच्या लोकांकडून केला कात असल्याचा आणि तिच्या पालकांकडून पैसे तसेच कार आणण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी पती आणि सासरच्या मंडळीवर ब्लॅकमेलिंग, घरगुती हिंसाचार, शोषण आणि गोपनीयतेवर आक्रमण केल्याबद्दल बीएनएसच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच घरातून जप्त केलेले गुप्तचर कॅमेरे आणि व्हिडिओ फुटेजची देखील चौकशी होणार आहे.