मुंबई: महाराष्ट्रात सध्या मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला असून अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई उपनगरात रात्रीपासून संततधार सुरु असून कांदिवली, बोरिवली, अंधेरी, गोरेगावसारख्या भागांत अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. आकाशात काळे ढग दाटून आले असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विदर्भात ढगफुटीसदृश पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांत अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील लघु पाटबंधारे प्रकल्प भरून ओसंडून वाहत आहे. यामुळे भिंतीला भगदाड पडल्याने प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथ्याच्या परिसरातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्रकिनारी उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.समुद्रात ३.५ ते ४.३ मीटर उंच लाटा येण्याचा अंदाज वर्तवल्याने होड्या-बोटी समुद्रात न नेण्याचे व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सरस्वती नदीला मोठा पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. बीड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र जालना जिल्ह्यातील वडीगोद्री परिसरात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, तत्काळ पंचनाम्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
चंद्रपूर, माजलगाव आणि इतर भागांतील पाऊस शेतकऱ्यांसाठी आश्वासक ठरत असला तरी, काही जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे नुकसानाची नोंद झाली आहे. लोणार परिसरात नदी-नाल्यांना पूर आला असून वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.