मुंबई : श्रावण महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची पूजा, व्रत आणि उपवास केले जातात. त्याचप्रमाणे केस न कापणे , मांसाहार टाळणे अशा अनेक प्रथा या महिन्यात पाळल्या जातात . या परंपरेमागे काही धार्मिक, आयुर्वेदिक कारणे आहेत.
भगवान शंकराची उपासना करण्यासाठी श्रावण महिना संपूर्णपणे भगवान शंकराला समर्पित मानला जातो. यावेळी अनेक भक्त सोमवारचं व्रत करतात आणि शिवलिंगावर जलाभिषेक करतात. अध्यात्मिक साधनेत अडथळा ठरू नये म्हणून मांसाहार या काळात वर्ज्य केला जातो. या महिन्यात शुद्ध आणि सात्त्विक आहारावर भर दिला जातो.
या काळात मांसाहार टाळणे ही एक जुनी परंपरा आहे, जी धर्म, आरोग्य यावर आधारित आहे. शरीर शुद्ध, मन शांत आणि आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या काळात शाकाहारी, सात्त्विक आहार घेणं हेच योग्य ठरतं. म्हणूनच अनेक लोक या काळात मांसाहार सोडून सात्विक आहार घेतात .
श्रावण महिन्यात मांसाहार टाळण्यामागे धार्मिक कारणांबरोबरच वैज्ञानिक कारणेदेखील तितकीच महत्त्वाची आहेत. पावसाळ्यात वातावरणात ओलावा आणि तापमानातील चढ-उतारामुळे शरीराची पचनशक्ती कमी होते. अशा परिस्थितीत मांसाहारासारखा जड आहार घेतल्यास अपचन, गॅस, पित्त, अन्नविषबाधा यासारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. याच काळात रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी झालेली असते, त्यामुळे सर्दी, ताप, त्वचारोग यांचा धोका वाढतो. पावसात मांस, मासे आणि अंडी लवकर खराब होतात व त्यातून अपायकारक बॅक्टेरिया तयार होतात. यातून संसर्गजन्य रोगांचा धोका अधिक वाढतो. शिवाय, मांसाहार हा तामसिक आहार मानला जातो, जो मानसिक स्थैर्यावर परिणाम करतो – चिडचिड, आळस, आणि मानसिक अस्वस्थता निर्माण करतो. त्यामुळे श्रावण महिन्यात मांसाहार टाळणे आरोग्यदृष्ट्याही फायदेशीर ठरते.