अत्तराचे नाव घेताच सगळीकडे सुगंध दरवळायला लागतो. अत्तराचे एक वेगळे महत्त्व आहे. अत्तराचे अनेक प्रकार असून ऋतूनुसार कोणते अत्तर वापरावे, अत्तराच्या इतर उपयोगांसोबतच अत्तर लावण्याची योग्य पद्धत आणि खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. अत्तर हे पारंपारिक पद्धती आणि नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेले सुगंधी तेल आहे. साधारणपणे अत्तर तयार करताना कोणत्याही प्रकारचे रसायन वापरले जात नाही. तर सुगंधी फवाऱ्यामध्ये (परफ्यूम) सुगंधी तेलांव्यतिरिक्त रसायने टाकून सुगंध तयार केला जातो. आपण प्रत्येकजण ऑफिसला व कोणत्याही कार्यक्रमात जाताना परफ्यूम किंवा अत्तर लावत असतो. शरीराला घाम आणि दुर्गंधी येऊ नये म्हणून प्रत्येकजण अत्तर किंवा परफ्यूम वापरतो. त्यातच आपल्यापैकी असे बरेच लोकं आहेत ज्यांना या दोन्ही गोष्टी एकसारख्याच वाटतात. त्यामुळे यांचा वापर सारख्या पद्धतीने करतात. परंतु प्रत्यक्षात या दोन्ही गोष्टींमध्ये मोठा फरक आहे. सध्या परफ्यूमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तर अत्तर हा दुर्मिळ झाला आहे. मात्र परफ्यूमपेक्षा अत्तर हे आरोग्यासाठी चांगले ठरते. आज या लेखातून दोघांमधले फरक जाणून घेऊया...
नैसर्गिक घटक
परफ्यूममध्ये बहुतेकदा कृत्रिम रसायने वापरली जातात, तर अत्तर हे फुले, औषधी वनस्पती आणि लाकूड यांसारख्या नैसर्गिक स्रोतांपासून बनवले जाते. यामुळे अत्तरला समृद्ध सुगंध असतो.
अल्कोहोल फ्री
परफ्यूम्समध्ये अल्कोहोलचा वापर केला जातो, परंतु अत्तर पूर्णपणे अल्कोहोलमुक्त असते. यामुळे ते त्वचेसाठी फायद्याचे ठरते.
दीर्घकाळ सुगंधी
अत्तरमध्ये शुद्ध आवश्यक तेलांचा जास्त प्रमाणात समावेश असतो, ज्यामुळे ते परफ्यूमच्या तुलनेत अधिक सुगंधी असते आणि दीर्घकाळ टिकते.
वापरण्याची पद्धत
परफ्यूम स्प्रे केले जातात, मात्र अत्तर थेट त्वचेवर लावले जातात. यामुळे दिवसभर त्याचा सुगंध टिकून राहतो.
पर्यावरणपूरक
अत्तर बहुतेकदा पारंपारिक, शाश्वत पद्धतीने तयार केले जाते, तर परफ्यूम कमी पर्यावरणपूरक असतात.
नैसर्गिक गुणधर्म
अत्तरात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत ज्यांची आयुर्वेद आणि युनानी वैद्यकशास्त्रातील अनेक ग्रंथांमध्ये प्रशंसा केली आहे. परफ्यूममध्ये अल्कोहोलचा वापर असल्याने त्वचेच्या समस्या वाढतात.
मॉइश्चरायझर त्वचा
कोणताही सुगंध त्वचेला लावण्यापूर्वी तुमचं आवडतं लोशन किंवा क्रीमने तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करा. मॉइश्चरायझ केलेल्या त्वचेला सुगंध जास्त काळ 'चिकटून' राहतील आणि त्वचेला दिवसभर सुगंध येईल.
परफ्यूमच्या गर्दीत अत्तराचा सुगंध अधिक
अत्तर हे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. अत्तर हे नैसर्गिक घटकांपासून बनवलेले असल्याने, ते त्वचेसाठी चांगले मानले जाते, विशेषत: ज्यांची त्वचा संवेदनशील आहे. काही विशिष्ट अत्तरांमध्ये उपचारात्मक गुणधर्म असतात, जे त्वचेला शांत करण्यास आणि रंग सुधारण्यास मदत करतात. अत्तर त्वचेत चांगले शोषले जाते आणि त्याचा सुगंध जास्त काळ टिकतो, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटते.