हायकमांड नाराज, केरळ युनिटचे 'असहकार आंदोलन'
केरळ: अमेरिकेत ऑपरेशन सिंदूरवर भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या शशी थरूरवर त्यांचा काँग्रेस पक्ष नाराज झाला आहे. पण, त्याबरोबरच थरूर यांच्या 'राष्ट्रवादप्रेमी' वक्तव्यांमुळे आता केरळ युनिटने देखील त्यांच्यावर 'असहकार आंदोलन' पुकारले आहे. ज्यामुळे या काँग्रेस खासदाराला आता पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमाला आमंत्रित केले जाणार नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे काँग्रेसमध्ये शशी थरूर यांच्यासाठी दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच कठीण होत जात असल्याच दिसून येत आहे.
देशातील अलिकडच्या घडामोडी आणि सीमेवरील परिस्थिती पाहता अनेक लोकं सैन्य आणि केंद्र सरकारला पाठिंबा दिल्याबद्दल शशी थरूर यांच्यावर टीका करत आहेत. यात काँग्रेसच्या काही नेत्यांचा देखील समावेश आहे. यांना उत्तर म्हणून शशी थरूर यांनी पक्षनिष्ठतेबद्दल आपली प्रतिक्रिया मांडताना, देशाला सर्वात आधी प्राधान्य मी देतो असे म्हंटले होते.
काय म्हणाले शशी थरूर?
शशी थरूर म्हणाले होते की देशाला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे आणि राजकीय पक्षांचे उद्दिष्ट देशाला चांगले बनवणे हे असले पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाआधी राष्ट्र प्रथम येते. आणि राजकीय पक्ष हे देश सुधारण्याचे केवळ एक माध्यम आहेत.
थरूर काँग्रेसमध्ये एकाकी पडत आहेत का?
सुरुवातीला पक्षाचे उच्चायुक्त त्यांच्या 'राष्ट्रवादप्रेमी' वक्तव्यांमुळे अस्वस्थ वाटत होते आणि आता केरळमधील त्यांच्या पक्षाच्या युनिटनेही त्यांच्यापासून स्वतःला दूर केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत सरकारला पाठिंबा देण्यावरून सुरू असलेला वाद इतका वाढला आहे की थरूर यांना आता तिरुअनंतपुरममधील कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रमात आमंत्रित केले जाणार नाही. अशा परिस्थितीत, प्रश्न असा निर्माण होतो की थरूर काँग्रेसमध्ये एकाकी पडत आहेत का? ते आता पक्षाच्या मार्गापासून दूर जाऊन 'सर्वांपेक्षा राष्ट्र' या भूमिकेवर ठाम राहतील की ते मोठा राजकीय निर्णय घेतील?
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या तीक्ष्ण विधानामुळे दरी वाढली
काँग्रेस आणि शशी थरूर यांच्यातील वाढत्या मतभेदांदरम्यान , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. मुरलीधरन यांनी रविवारी एक मोठे विधान केले की, जोपर्यंत थरूर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांना तिरुअनंतपुरममधील कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रमात आमंत्रित केले जाणार नाही. मुरलीधरन म्हणाले की, काँग्रेस कार्यकारिणी समितीचे (सीडब्ल्यूसी) सदस्य असलेले थरूर आता 'आपल्यापैकी एक' मानले जात नाहीत. थरूर यांच्याविरुद्ध काय कारवाई करायची हे पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व ठरवेल असेही त्यांनी सांगितले.
शशी थरूर यांची भूमिका काय आहे?
शनिवारी कोची येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, "मी माझ्या भूमिकेवर ठाम राहीन कारण मला वाटते की ते देशासाठी योग्य आहे." थरूर म्हणाले की जेव्हा त्यांच्यासारखे नेते राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी इतर पक्षांशी सहकार्य करण्याबद्दल बोलतात तेव्हा त्यांचा स्वतःचा पक्ष त्याला विश्वासघात म्हणून पाहतात, आणि ही सर्वात मोठी समस्या आहे.
पक्षाच्या राज्य शाखेनेही विरोध केला
यापूर्वी, मुरलीधरन यांनी थरूर यांना एका सर्वेक्षणावरून लक्ष्य केले होते ज्यामध्ये त्यांना यूडीएफकडून मुख्यमंत्रीपदासाठी आवडते उमेदवार घोषित करण्यात आले होते. यावर मुरलीधरन म्हणाले होते की, 'त्यांनी आधी ते कोणत्या पक्षात आहेत हे ठरवावे.' पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर थरूर यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे ते पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी संघर्षात सापडले आहेत. त्यांच्या काही विधानांमुळे काँग्रेसची स्थिती कमकुवत झाली, ज्यामुळे पक्षात असंतोष वाढत गेला असल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात आहे.
मुरलीधरन यांनी एका मल्याळम वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लेखाद्वारे म्हंटले होते कि," थरूर यांनी आणीबाणीबद्दल इंदिरा गांधींवर टीका केली होती. जर थरूर यांना काँग्रेसमध्ये अस्वस्थ वाटत असेल तर त्यांनी वेगळा राजकीय मार्ग निवडला पाहिजे." एका वरिष्ठ नेत्याच्या या तीष्ण विधानामुळे थरूर यांचे पुढचे पाऊल काय असणार? हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.