Saturday, September 6, 2025

मध्य प्रदेशात 'रील'च्या नादात २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर

मध्य प्रदेशात 'रील'च्या नादात २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर

मध्य प्रदेश: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रयत्नात लोक कसे आपला जीव धोक्यात घालत आहेत, याचे एक भीषण उदाहरण मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात समोर आले आहे. परेवा खोह या पर्यटनस्थळी आयुष यादव (वय २०) नावाच्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. चप्पल काढण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल गेला आणि तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी (१९ जुलै) घडली असून, त्याचा थरकाप उडवणारा व्हिडिओही समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनादौन येथील रहिवासी असलेला आयुष यादव आपल्या मित्रांसोबत परेवा खोह येथे फिरण्यासाठी गेला होता. हे पर्यटनस्थळ आदेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असून, आदेगावपासून ७ किमी अंतरावर आहे. मित्रांसोबत मजा करत असताना, रील्स बनवण्याची कल्पना डोक्यात आली. याच प्रयत्नात आयुषची चप्पल नदीत पडली.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, आयुष एका दगडावर बसून काठीच्या मदतीने नदीतील चप्पल काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे मित्रही त्याला मदत करत होते. मात्र, अचानक त्याचा पाय घसरला आणि तो नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु नदीचा प्रवाह खूपच तीव्र असल्याने ते अयशस्वी ठरले.

या घटनेने घाबरलेल्या मित्रांनी तात्काळ पोलीस आणि आयुषच्या कुटुंबीयांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि गावकऱ्यांच्या मदतीने आयुषचा शोध सुरू केला. रविवारी सायंकाळी त्याचा मृतदेह नदीत सापडला, अशी माहिती आदेगाव पोलीस स्टेशनच्या प्रभारी पूजा चौकसे यांनी दिली.

परेवा खोह हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असले तरी, नदीच्या प्रवाहामुळे येथे धोकादायक परिस्थिती निर्माण होते. या घटनेने पुन्हा एकदा रील्स बनवण्याच्या वेडापायी होणाऱ्या दुर्घटनेवर प्रकाश टाकला आहे. पालकांनी २० वर्षे जपलेल्या मुलाचा अशा अकाली मृत्यूमुळे यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment