मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अखिलेंद्र प्रताप सिंग आणि आकाशदीप सिंग या दोन आरोपींचा जामीन अर्ज विशेष मोक्का न्यायालयाने फेटाळला. बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी हत्या झाली होती. त्यांच्यावर तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या प्रकरणात कॉल डेटा रेकॉर्डच्या मदतीने पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले होते.
आरोपींविरोधात सध्या न्यायालयीन कारवाई सुरू आहे. ही कारवाई सुरू असतानाच अखिलेंद्र प्रताप सिंग आणि आकाशदीप सिंग या दोन आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. जामीन मागताना, अखिलेंद्रने मकोका लावण्याच्या पोलिसांच्या निर्णयालाच आव्हान दिले. तर आकाशदीपने त्याला आरोपी करण्यासाठी पोलिसांकडे ठोस पुरावेच नसल्याचा दावा केला.
आरोपींच्या जामिनावर सुनावणी झाली त्यावेळी विशेष सरकारी वकील महेश मुळे आणि सिद्दीकीचे वकील प्रदीप घरत आणि त्रिवनकुमार कर्णानी यांनी आक्षेप घेतला. आरोपपत्रात असे काही आहे जे प्रथमदर्शनी आरोप सिद्ध करते. यामुळे जामीन देऊ नये अशी भूमिका विशेष सरकारी वकील महेश मुळे यांनी घेतली. सरकारी पक्ष आणि पीडित कुटुंबाच्या वकिलांनी केलेल्या आक्षेपांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले.