दैनिक प्रहारच्या बातमीची घेतली दखल
कर्जत : अखेर आज आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फित कापून सुलभ शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले असून शनिवारपासून हे सुविधा केंद्र महिलांसाठी खुले करण्यात आले आहे.
कर्जत तालुक्यातील कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव येथे सार्वजनिक बांधकाम मंडळ रायगड, पनवेल विभाग, उपविभाग कर्जत (अंतर्गत) या विभागामार्फत महिलांसाठी अत्याधुनिक वातानुकूलित शौचालय आणि सुविधा केंद्र उभारले आहे. सदर सुविधा केंद्राचे काम पूर्ण होऊन ४ महिन्यांचा कालावधी उलटला तरी फक्त उद्घाटनाची औपचारिकता बाकी होती. याबाबत दैनिक प्रहारमध्ये ‘अत्याधुनिक महिला शौचालयाची प्रतीक्षा’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती. सदर बातमीची दखल घेत अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते शनिवारी या सुलभ शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले असून ते महिलांसाठी खुले करण्यात आले आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय वानखेडे, माजी नगरसेवक संकेत भासे, अभिषेक सुर्वे, संभाजी जगताप, दिनेश कडू, पुंडलिक भोईर, मिलिंद दिसले, सचिन खंडागळे, शानू दुलगच, सुदेश देवघरे, उलू कंपनीची संपूर्ण टीम आदी मान्यवर उपस्थितीत होते.
कर्जत स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर हे ठिकाण असून या ठिकाणी बस स्टॉप तसेच रिक्षा स्टँड, शालेय कॉलेज विद्यार्थ्यांचे स्टॉप, कंपनी बस स्टॉप असल्याने ह्या नाक्यावर कायम नागरिकांची वर्दळ असते. त्यातच परिसरात महिला व पुरुषांसाठी कोणत्याही प्रकारची शौचालयाची सुविधा नव्हती. गेल्या अनेक वर्षांची मागणी आपल्या माध्यमातून पूर्ण केल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले. तसेच हे सुलभ शौचालय महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे कर्जत शहरातील अनेक भागात अशा पद्धतीचे शौचालय उभारणार असल्याचे आमदार थोरवे यांनी सूतोवाच केले.