मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज मंडई , क्रॉफर्ड मार्केटमधील कोळी महिला व मासळी व्यावसायिक यांना नवीन निर्माण करण्यात आलेल्या भुयारी मंडईत स्थलांतरित करण्याच्या संदर्भात गेले दोन दिवस बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे आणि महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठका पार पडल्या. त्यामुळे या समस्येवर आता तोडगा निघत असून नितेश राणे यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे आणि या प्रकरणात स्वतः लक्ष घातल्यामुळे येत्या २२ तारखेला निघणारा मोर्चा हा स्थगित करण्यात आला असल्याची घोषणा शनिवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणे , मुंबई फ्रेश फिश डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष बळवंतराव पवार व अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते .
छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईतील परवानाधारकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले मंडई मध्ये येथे मासळी मंडईचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामध्ये ब्लॉक ३चे बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या किरकोळ मासळी विभागातील परवानाधारकांना बांधकाम पूर्ण झालेल्या ठिकाणी जागा देण्यात येत आहे. त्यामुळे पलटण रोड येथील जुन्या मासळी मंडईतील जागा रिक्त करून महात्मा ज्योतिबा फुले मंडई मध्ये स्थलांतरित करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली होती. मात्र महात्मा फुले मंडईतील जागा बेसमेंटमध्ये असल्याने तेथे मच्छिमार जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे पलटण रोडवरील मासळी बाजाराचे पुनर्निर्माण करून त्यांना जागा देण्यासाठी मच्छीमार संघटना वारंवार महापालिकेकडे पाठपुरावा करत होते. मात्र अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत होते. अखेर या संघटनांनी मत्स्य विभाग मंत्री नितेश राणे यांच्याकडे दाद मागितली असता नितेश राणे यांनी स्वतः त्यात लक्ष घालून पालिका आयुक्तांबरोबर बैठका घेतल्या. त्यातून लवकरच तोडगा निघत असल्याची शक्यता असल्याने येत्या २२ तारखेला होणारा मोर्चा हा तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली .
यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, आपण विविध मच्छीमार संघटना तसेच महापालिका आयुक्तांची भेट घेतली असून अनेक मुद्दे व प्रश्न उपस्थित केले आहेत त्यात पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून काही दिवसातच आणखी बैठका होणार आहेत. त्याचा फायदा हा थेट मच्छीमारांना व तेथे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना होणार आहे . त्यांचे पूर्ण समाधान होईपर्यंत आपण हा विषय पुढे नेत राहू असे त्यांनी मंत्री राणे यांनी स्पष्ट केले .
यावेळी बोलताना दि मुंबई फ्रेश फिश डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष बळवंतराव पवार, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनीही आपली भूमिका मांडली.