तिरुपती : ज्या धर्मात जन्मले आहेत त्या धर्माऐवजी इतर धर्माचे पालन करताना आढळल्यामुळे तिरुमला तिरुपती देवस्थानम्सने (टीटीडी) अर्थात तिरुपती देवस्थानातून चार हिंदू कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये उपकार्यकारी अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) बी. एलिझार, बीआयआरआरडी रुग्णालयातील स्टाफ नर्स एस. रोसी, बीआयआरआरडी रुग्णालयातील ग्रेड-१ फार्मासिस्ट एम. प्रेमावती आणि एसव्ही आयुर्वेद फार्मसीमध्ये काम करणारे जी. असुंथा यांचा समावेश आहे.
तिरुपती देवस्थानाच्या नियमानुसार मंदिरात फक्त देवावर श्रद्धा असलेले हिंदू कर्मचारीच काम करू शकतात. कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या या नियमांचे पालन केले नाही आणि हिंदू धार्मिक संघटनेचे प्रतिनिधित्व करणारे आणि काम करणारे कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावताना बेजबाबदारपणे वागले. यामुळे संस्थेचे नियमानुसार संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याचे तिरुपती देवस्थानाने जाहीर केले आहे. संस्थेच्या दक्षता विभागाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. याआधी दहा दिवसांपूर्वी सहाय्यक कार्यकारी अधिकारी कॅडरमधील वरिष्ठ अधिकारी ए. राजशेखर बाबू यांच्यावर अशाच प्रकारच्या उल्लंघनासाठी तिरुपती देवस्थानाने कारवाई केली होती.