इस्लामाबाद : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २५ पर्यटक आणि एक पर्यटकांचा सहाय्यक अशा २६ जणांची पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट अर्थात टीआरएफने हत्या केली. अतिरेक्यांच्या गोळीबारात २६ निरपराध ठार झाले. याला उत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर केले. पाकिस्तानमधील निवडक अतिरेकी तळांवर भारताने हल्ले केले. तर अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने द रेझिस्टन्स फ्रंट अर्थात टीआरएफ या अतिरेकी संघटनेवर बंदी घातली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी द रेझिस्टन्स फ्रंट अर्थात टीआरएफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय. त्यामुळे टीआरएफ या दहशतवादी संघटनेची क्रूरता जगासमोर आलीय. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे केलेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असलेल्या टीआरएफ या संघटनेने स्वीकारली. याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली. भारतानं ही कारवाई दहशतवादाविरुद्ध 'जीरो टॉलरन्स' धोरणाचा भाग असल्याचं स्पष्ट केलं.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरला जगातील अनेक देशांचा पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा TRF संदर्भातला निर्णय आला आहे. भारताने या निर्णयाचे स्वागत केले आहे. एरवी पाकिस्तानला साथ देणाऱ्या चीननेही अमेरिकेच्या TRF वर बंदी घालण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. यामुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे.