मुंबई: बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट 'येरे येरे पैसा ३' आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती पैसा गोळा करेल हे लवकरच कळेल, पण तत्पूर्वी या सिनेमातील गाण्यांनी तुफान राडा केला आहे. अलीकडेच या सिनेमातील आणखीन एक गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, इतर गाण्यांप्रमाणे 'गुलाबाची कळी' हे गाणे देखील सोशल मीडियावर चांगलेच गाजले आहे.
हे गाणं चित्रपटातील बबली या पात्रावर चित्रित करण्यात आलं आहे, ज्यात तिचा बिनधास्त, बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. बबलीच्या दिलखेच अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बेला शेंडे यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं गायलं गेलं आहे, तर पंकज पडघन यांनी याला जबरदस्त संगीत दिलं आहे. गाण्याचे बोल सचिन पाठक (यो) यांनी लिहिले असून, उमेश जाधव यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे.
दिग्दर्शक संजय जाधव यांनी सांगितलं की, "मनोरंजनाची मेजवानी असलेल्या या चित्रपटात प्रत्येक पात्राची स्वतःची एक ओळख आहे, ज्यात बबली खास आहे. 'आली रे आली गुलाबाची कळी' हे बबलीचा स्वॅग दाखवणारे गाणे आहे." संगीतकार पंकज पडघन यांनी म्हटलं, "बबलीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे, त्यामुळे या गाण्याला त्याच ताकदीचे संगीत देणं आवश्यक होतं. गाण्याचे बोल, आवाज, संगीत आणि नृत्य यांची मस्त भट्टी जमल्याने हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल."
धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित आणि वर्डविझार्ड एंटरटेनमेंट सहनिर्मित असलेल्या या चित्रपटाचे निर्माते सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे आहेत, तर सौरभ लालवाणी सहनिर्माते आहेत.
संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांसारख्या दमदार कलाकारांचा समावेश आहे. 'येरे येरे पैसा ३' १८ जुलै रोजी (आज) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.