मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होईल तसेच गुरुवारी संध्याकाळी विधानभवनात झालेल्या हाणामारीवरुन आरोपप्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.
सत्ताधारी आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये गुरुवारी संध्याकाळी विधानभवनात हाणामारी झाली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज बारकाईने तपासावे आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यामुळे हाणामारीच्या मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक शुक्रवारी सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे.
याआधी विधानभवनात गुरुवारी राडा झाल्यानंतर मध्यरात्री जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी अटक केली. रात्री साडे तीन वाजता नितीन देशमुख याला जे जे मध्ये मेडिकलसाठी नेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले. नितीन देशमुखला घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड हे पोलिसांच्या गाडीसमोर आडवे झोपले. यावेळी पोलिसांनी त्यांना अक्षरश: खेचून बाहेर काढले.
पडळकरांनी मागितली माफी
आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानभवनात घडलेल्या घटनेप्रकरणी पत्रकारांशी बोलताना जाहीर माफी मागितली. विधानसभाध्यक्ष गुरुवारच्या घटनेप्रकरणी जो निर्णय देतील तो स्वीकारणार, असेही गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले.