NCB व रेल्वे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या नायजेरियन महिलेमार्फत कोणत्या टोळीशी संपर्क आहे, ही ड्रग्ज कुठून आणली गेली आणि कुठे पोहोचवायची होती, याचा शोध घेतला जात आहे.
कसा झाला पर्दाफाश?
बेंगळुरु NCBच्या गुप्त माहितीच्या आधारे, मंगला एक्सप्रेस या रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलेवर लक्ष ठेवण्यात आले होते. संबंधित महिला पनवेल स्थानकावर पोहोचताच, NCB आणि पनवेल रेल्वे पोलीस यांच्या पथकाने तिला अटक केली. तिच्याकडून 'मेथाम्फेटामाइन' हा अत्यंत घातक आणि व्यसनाधीन बनवणारा पदार्थ सापडला. हे ड्रग्ज साडेतीन किलो वजनाचे असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे ३५ कोटी रुपये असल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.
सध्या जप्त करण्यात आलेले ड्रग्ज रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) ताब्यात देण्यात आले आहे. तसेच आरोपी महिलेला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.
ड्रग्स तस्करीसाठी रेल्वेचा वापर!
"बेंगळुरु NCBच्या माहितीच्या आधारे ही संयुक्त कारवाई यशस्वी झाली. ड्रग्स तस्करीसाठी रेल्वेचा वापर होत असल्याचे समोर येत असून, अशा प्रकारच्या कारवायांसाठी रेल्वे पोलीस आणि NCB मिळून कठोर पावले उचलत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून, अधिक आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू आहे,'' अशी माहिती रेल्वे पोलीस उपायुक्त प्रज्ञा शेडगे यांनी दिली आहे.