मुंबई (प्रतिनिधी) : एसी लोकलचे तिकीट दर साध्या लोकलसारखे होण्यासाठी राज्य सरकारने केंद्रात बोलणी सुरू केल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना मुंबईतील सर्वसामान्यांचा प्रवास गारेगार होण्याची शक्यता आहे. मुंबईतील एसी लोकल ट्रेनचे तिकीट दर साध्या लोकल तिकीट दरासारखे करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे बोलणी सुरू केल्याची माहिती विधानसभेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मुंबईत एसी लोकलला साध्या लोकलचे दर लावता येतील, याविषयी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबई लोकल ट्रेनबाबत माहिती देताना मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, मुंबई लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेसह वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात येत आहे. यावेळी मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले.