भात लावणीसाठी शेतात पाण्याची व्यवस्था करताना शेतकरी
भात, वरई पिकांची लागवड खोळंबली
मोखाडा : राज्यात सगळीकडे मुसळधार पडणारा पाऊसाने मोखाडा शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. सकाळी व सायंकाळी दहा पंधरा मिनिटे तुरळक पाऊस पडत असून दुपारच्या वेळी तर आकाश निरभ्र होत असून उकाडा जाणवत आहे.
यामुळे तयार झालेल्या भात, वरई पिकांची लागवड खोळंबली आहे. दिवसभर मुसळधार पाऊस न पडता अधुनमधून अर्धा एक तास मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांने सुध्दा आपल्या शेतात भात, वरई या पिकांची लागवड करायला सुरुवात केली होती. परंतु गेल्या दोन तीन दिवसांपासून सकाळी एकदा दहा पंधरा मिनिटे हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला की, दिवसभर पाऊस पडत नाही. आकाश पुर्णतः निरभ्र राहत आहे.
यामुळे शेतात लागवडीस तयार झालेल्या भात पीकाची लावणी मात्र खोळंबली आहे. तर काही शेतकऱ्यांनी शेजारील शेतातील पाणी आपल्या शेतात घमेले, बादलीच्या सहाय्याने आणून लागवड चालू ठेवली आहे. त्याचप्रमाणे चालू वर्षी कामांवर येणाऱ्या मजूरांची मजुरी दोनशे पन्नास वरून तीनशे रुपयांवर गेल्याने भरीव शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती परवडेनासे झाली असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहे.
एरवी शेतकरी पुनर्वसु नक्षत्रात हळवी भाताची शेतात लागवड पूर्ण करून वरई पिकाची लागवड करायला घेतो. मात्र यंदा पाहिजे तसा पाऊस सुरूवातीला पडल्याने ऐन लागवडीच्या काळात मात्र पाऊसाने उघडीप दिली आहे. यामुळे अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हळवी भाताची लागवड केलेली नसून जोरदार पावसाची वाट बघत
असल्याचे चित्र तालुक्याच्या ग्रामीण
भागात दिसून येत आहे.