नाशिक : नाशिक-वणी रस्त्यावर दिंडोरी बाजार समितीसमोर रात्री कार-दुचाकीची समोरासमोर धडक झाली. धडक झाल्यानंतर कार नाल्यात कोसळली. या अपघातात नाल्याच्या पाण्यात बुडून कारमधील सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरूष, तीन महिला आणि लहान बाळाचा समावेश आहे. सर्व मृत नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातील रहिवासी आहेत.
अपघातात ज्यांचा मृत्यू झाला ते सर्वजण एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेले होते. घरी परततेवेळी अपघात झाला. कार आणि दुचाकीची धडक झाली. या धडकेनंतर चालकाने नियंत्रण गमावले आणि कार नाल्यात जाऊन कोसळली. कारमध्ये बसलेल्यांना बाहेर येण्याची संधीच मिळाली नाही. यामुळे कारमध्ये असलेल्या सात जणांचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
कारमधील देविदास गांगुर्डे (२८, सारसाळे), मनिषा गांगुर्डे (२३, सारसाळे), उत्तम जाधव (४२, कोशिंबे), अलका जाधव (३८, कोशिंबे), दत्तात्रेय वाघमारे (४५, देवपूर, देवठाण), अनुसया वाघमारे (४०, देवपूर, देवठाण), भावेश गांगुर्डे (दोन) यांचा मृत्यू झाला. दुचाकीवरील मंगेश कुरघडे (२५), अजय गोंद (१८, रा. जव्हार, पालघर, सध्या सातपूर, नाशिक) हे जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.