किल्ले रायगडावरील पायरी मार्ग १५ ऑगस्टपर्यंत बंद
रायगड : किल्ले रायगडावर संभाव्य आपत्तीमुळे जीवित अथवा वित्तहानी होऊ नये, या उद्देशाने रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गडावर जाणारा पायरी मार्ग येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व नागरिक, पर्यटकांसाठी प्रतिबंधित केल्याची माहिती लेखी आदेशाद्वारे दिली आहे.
यासंदर्भात महाड उपविभागीय अधिकारी यांच्या २० जूनच्या अहवालानुसार आगामी पावसाळ्यामध्ये दगडी वारंवार पडण्याच्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसून दगडी पडून कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्त हानी होऊ नये, याकरिता किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग पावसाळा ऋतू संपेपर्यंत बंद करण्यात यावा. व पर्यटकांना किल्ले रायगडावर जाण्यासाठी रोपवेचा वापर करण्याबाबत प्रसार माध्यमांतून माहिती द्यावी, अशी विनंती उपविभागीय अधिकारी महाड यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली होती. या अहवालानुसार पायरी मार्गावर दरड कोसळणे, पाण्याचा प्रवाह वाढल्यास पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, म्हणून पायरी मार्गावरील किल्ले रायगडावर जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा, असा निर्णय रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी घेतला असून तो तातडीने अंमलात येणार आहे .
जुलै महिन्यात अतिवृष्टीचा इशारा असल्याने नागरिक व पर्यटकांना या मार्गाने जाण्यास प्रतिबंध करावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांनी नाणे दरवाजा, चित्तदरवाजा तसेच किल्ले रायगड येथे पुरेसा बंदोबस्त ठेवावा, असे सुचित करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्यास संबंधित व्यक्ती विरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.