मुंबई: झी मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचे नवे पर्व येत्या २६ जुलैपासून दर शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या पर्वात एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळणार असून, १० वर्षांपासून सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणारे डॉ. निलेश साबळे यांच्या जागी आता लोकप्रिय अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करणार आहे. या नव्या आणि महत्त्वाच्या जबाबदारीविषयी अभिजीतने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या.
झी मराठीसोबतच्या जुन्या नात्याची आठवण करून देताना अभिजीत म्हणाला, "झी मराठीसोबतचं माझं नातं माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून आहे. 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या कार्यक्रमातून मी या क्षेत्रात आलो. त्यामुळे जेव्हा 'चला हवा येऊ द्या' सारख्या लोकप्रिय कार्यक्रमासाठी मला विचारण्यात आलं, तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता."
सूत्रसंचालनाची आवड असल्याने त्याने हे आव्हान स्वीकारल्याचे सांगितले. गेल्या १० वर्षांपासून हा कार्यक्रम ज्या उंचीवर पोहोचला आहे, तिथून तो पुढे घेऊन जाणे हे खरोखरच 'चॅलेंजिंग' असल्याचे अभिजीतने मान्य केले. तो म्हणाला, "प्रेक्षकांना आधीच्या पर्वाप्रमाणेच या पर्वाकडूनही तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षा अधिक अपेक्षा आहेत, याची मला कल्पना आहे. पण मला त्याचं दडपण अजिबात नाही." आधीच्या पर्वाचे कोणतेही 'बॅगेज' (ओझे) नसल्यामुळे आपण आपल्या पद्धतीने नवीन सुरुवात करणार असल्याचेही त्याने सांगितले. या नव्या हंगामासाठी तो प्रचंड उत्साही आहे.
'चला हवा येऊ द्या'च्या या नव्या पर्वात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक नवीन स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती अभिजीतने दिली. याविषयी आनंद व्यक्त करताना तो म्हणाला, "ऑडिशनला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या निमित्ताने काही नवीन हास्यकलाकार महाराष्ट्राला मिळतील आणि त्यांच्या करिअरलाही एक नवी दिशा मिळेल."
कार्यक्रमाच्या टीमसोबत काम करण्याबद्दल अभिजीत म्हणाला की, त्यांची आधीपासूनच भेट होत असल्यामुळे संपूर्ण टीमसोबत, म्हणजेच श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव आणि भारत गणेशपुरे यांच्यासोबत त्याचे 'बॉण्डिंग' खूप छान आहे. आतापर्यंत प्रेक्षक म्हणून अनुभवलेल्या या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून भाग होणे अधिक मजेशीर असेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
प्रेक्षकांनी आधीच्या पर्वांवर जसे प्रेम केले, तसेच प्रेम या पर्वालाही द्यावे, असे आवाहन अभिजीतने केले. यंदाचा सीझन नव्या पद्धतीने सादर केला जाणार असून, हे बदल प्रेक्षकांना नक्की आवडतील याची काळजी घेतल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, 'चला हवा येऊ द्या- कॉमेडीच गॅंगवार' या नव्या सीझनमध्ये श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, प्रियदर्शन जाधव आणि गौरव मोरे हे मेन्टॉरच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर त्यांच्या टीममध्ये महाराष्ट्रभरातून निवडलेले विनोदवीर सहभागी होणार आहेत.