मुंबई : ईएसआयसी नगर ते डी.एन, नगर जुहू येथील इस्कॉन मंदिराजवळील मेट्रो स्थानकास ‘हरे रामा हरे कृष्ण स्थानक’ नाव देण्याची २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी निवेदानास्द्वारे केलेली मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली असून तश्या सूचना त्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांना दिल्या आहेत.
२७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी सोमवार १४ जुलै २०२५ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधिमंडळातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला नगर विकास विभागाचे प्रधान सचिव आसीम गुप्ता, म्हाडाचे उपमुख्य अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल, बीएमसीचे आयुक्त भूषण गगराणी, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी, अतिरिक्त सीपी मीना, एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मेट्रो मार्गिका-२ ब (Metro Route 2B) च्या मार्गावरील डी.एन.नगर, अंधेरी (पश्चिम) ते मंडाले असा प्रवास टप्पा करणारी मार्गिका आहे. मुंबईच्या पूर्व व पश्चिम वाहिनीस जोडणारी हि मेट्रो मार्गिका आहे. शिवाय पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारी मार्गिका आहे. या मार्गावर जुहू येथे इस्कॉन मंदिर आहे. मुंबईतून नव्हे तर देशविदेशातून येथोल हरे रामा हरे कृष्ण मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. दिवसागणीक या मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच नवीन मेट्रो मार्गिका २ ब चा मार्ग हा या मंदिराच्या जवळून जात असल्याने येथील मेट्रो स्टेशनला हरे राम हरे कृष्ण मंदिर स्थानक असे नामकरण करणात यावे अशी भाविकांची मागणी आहे. त्यानुसार खासदार रवींद्र वायकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सोमवारी पार पडलेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार मेट्रोच्या तेथील रेल्वे स्थानकास हरे रामा हरे कृष्ण मंदिर स्थानक असे नाव देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री यांनी एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी याना दिल्या.