नवी दिल्ली : बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्राध्यापक मुहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंबे पाठवले आहेत. बांगलादेशकडून दरवर्षी आंबे पाठवले जातात, पण यावेळी दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे असल्याने या आंब्यांना खास महत्त्व आले आहे. ऑगस्टमध्ये शेख हसीना पंतप्रधान पदावरून गेल्यानंतर नवी दिल्ली आणि ढाका यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.
बांगलादेशमधील हंगामी सरकार भारतासोबतचे संबंध मधूर करण्यास इच्छुक आहे. याचे संकेत म्हणून युनूस यांनी पंतप्रधान मोदींना १ हजार किलो ‘हरिभंगा’ आंबे पाठवले आहेत. विशेष म्हणजे, माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ही ‘आंबा कूटनीति’ सुरू केली होती. जी बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या एका वर्षात भारत-बांगलादेश संबंधांमध्ये अनेक चढ-उतार आले आहेत. अशा परिस्थितीत, बांगलादेशच्या या पावलाकडे भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी एक नवा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.