नालासोपारा : लायसन्स विचारले म्हणून बापलेकाने वाहतूक पोलिसाला मारहाण केली. ही धक्कादायक घटना नालासोपारा येथे घडली.
नालासोपारा पूर्वेकडील नागीनदास पाडा परिसरात सीतारा बेकारीच्या समोर हनुमंत सांगळे आणि शेषनारायण आठरे हे दोन वाहतूक पोलीस रस्त्यावरुन येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांनाच्या चालकांना थांबवून वाहनांशी संबंधित कागदपत्रे, लायसन्स याची तपासणी करत होते. तपासणी करणाऱ्या पोलिसांनी एका दुचाकीस्वार मुलाला पोलिसांनी अडवले. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स व गाडीच्या कागदपत्रांची चौकशी केली. चौकशी दरम्यान मुलगा विना लायसन्स गाडी चालवत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
ड्रायव्हिंग लायसन्स आणि कागदपत्रं विचारल्यामुळे मुलगा चिडला. त्याने वडिलांना बोलावले. मुलगा आणि त्याच्या वडिलांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेला. बापलेकाने वाहतूक पोलिसांना मारहाण सुरू केली. दिवसाढवळ्या भर रस्त्यात रस्त्यात हा प्रकार सुरू होता. काही नागरिकांनी हस्तक्षेप करुन मारहाणीचा प्रकार थांबवला. या घटनेचा उपस्थित असलेल्यांपैकी काहींनी मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार करुन व्हायरल केला. आता तुळींज पोलीस ठाण्यात वाहतूक पोलिसांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील पोलीस तपास सुरू आहे.