मुंबई (प्रतिनिधी) : दहावी बोर्डाचा निकाल दि. १३ मे रोजी लागला. पण, निकाल लागून दोन महिने लोटल्यानंतरही हजारो विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेतच आहेत. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या असंख्य विद्यार्थ्यांचे प्रवेशही झालेले नाहीत. त्यामुळे अर्ज चुकला असेल का, प्रवेश मिळणार की नाही, या चिंतेने विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही धाकधूक वाढली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानुसार अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया १९ मेपासून सुरू करण्यात आली होती.
सराव नोंदणीनंतर दि. २१ मेपासून प्रत्यक्ष नोंदणी सुरू होणार होती. मात्र, पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचे संकेतस्थळ ठप्प पडले आणि प्रक्रिया खोळंबली. पुढे दि. २६ मेपासून पुन्हा नोंदणी सुरू करण्यात आली. दि. ३ जूनपर्यंत असलेली मुदत पुढे ५ जून व नंतर ८ जूनपर्यंत वाढविण्यात आली.
दि. ११ व दि. १२ जूनला महाविद्यालयीन कोटा प्रवेश घेण्यात आले. १४ जूनपासून सामान्य प्रवेश सुरू होणार होते. मात्र, शिक्षण विभागाने प्रवेशप्रक्रिया तब्बल १०-१२ दिवस पुढे ढकलली. २६ जूनला यादी जाहीर होणार होती व २७ पासून प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार होती. त्यानुसार २६ तारखेला दिवसभर ऑनलाइन पडताळणी करणाऱ्या विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.