‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवनव्या मालिकांचा प्रवाह अखंड सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच वाहिनीवर समृद्धी केळकरची मुख्य भूमिका असलेली ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ही नवीन मालिका प्रेक्षकांची मने जिंकत असतानाच आता ‘लपंडाव’ ही नवीकोरी मालिका ‘स्टार प्रवाह’वर लवकरच सुरू होणार आहे.

‘लपंडाव’ या मालिकेबद्दल गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या नव्या मालिकेत लोकप्रिय अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री कृतिका देव प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री रूपाली भोसले पुन्हा एकदा मालिका विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे. यावेळी संजना नाही, तर ‘सरकार’ बनून ती पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप पाडणार आहे. रूपाली भोसले या नव्या मालिकेत सखीच्या म्हणजेच कृतिकाच्या आईची भूमिका साकारणार आहे. ‘लपंडाव’ मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना रूपाली म्हणाली, “लपंडाव मालिकेत तेजस्विनी कामत हे पात्र मी साकारत आहे. जिला सगळे आदराने ‘सरकार’ असे म्हणतात. प्रेम आणि नात्यांपेक्षा तिच्या लेखी पैशांना सर्वांत जास्त महत्त्व आहे. घरात आणि ऑफिसमध्येही सर्वत्र फक्त तेजस्विनीचे राज्य आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका नक्कीच वेगळी आणि आव्हानात्मक आहे.”