यानातून अंतराळवीर २२ तासांचा प्रवास करुन पृथ्वीवर परतणार आहेत. पृथ्वीवर परतताच अंतराळवीरांची १८ दिवसांची मोहीम पूर्ण होणार आहे. अॅक्स -४ या यानाच्या क्रूमध्ये कमांडर पेगी व्हिट्सन, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) पायलट शुभांशू शुक्ला , युरोपियन अंतराळ संस्थेचे (ईएसए) प्रकल्प अंतराळवीर पोलंडचे स्लावोस "सुवे" उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हनर (हंगेरियन टू ऑर्बिट) अंतराळवीर टिबोर कापू यांचा समावेश आहे. या पथकाने विशिष्ट कक्षेत फिरणाऱ्या प्रयोगशाळेत साठ पेक्षा जास्त वैज्ञानिक प्रयोग केले. यापैकी सात प्रयोग हे इस्त्रोने तयार केलेले होते. यात मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये मेथी आणि मूग यांचे स्प्राऊटिंग, पाण्यातील सूक्ष्म जीवांचे Regeneration आणि स्नायूंच्या नुकसानावरील संशोधनाचा समावेश आहे. याशिवाय, कर्करोग संशोधन, डीएनए दुरुस्ती आणि अंतराळातील मानसिक तणाव यांचाही अभ्यास केला. हे प्रयोग भविष्यातील गगनयान मोहिमेसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. ही मोहीम भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी मैलाचा दगड आहे. शुभांशू यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अनुभव हा २०२७च्या गगनयान मोहिमेला उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणार आहे. भारताने पाचशे कोटी रुपये खर्चून ही संधी मिळवली, ज्यामुळे २०३५ पर्यंत स्वतःचं अंतराळ स्थानक आणि २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे स्वप्न सत्यात उतरवणं शक्य होणार आहे.
नियोजनानुसार यान सोमवार १४ जुलै २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळे होईल. यानंतर यानाचा पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू होईल. यान मंगळवार १५ जुलै २०२५ रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात उतरेल.