राज्यात काही दिवस हलका पाऊस, पुण्यात आज पाऊस ब्रेक घेणार
पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. येत्या ४८ तासांत कोकण, गोवा, विदर्भात बऱ्याच तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील. तर १२ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पावसाच्या मध्यम सरी पडणार असून, राज्यात १५ जुलैपर्यंत पावसाचा जोर कमी असणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यामुळे कोकण किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा निर्माण झालेला पट्टा देखील आता विरून गेला आहे. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून असलेला पावसाचा जोर पुरता ओसरला आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील दोन ते तीन दिवस विदर्भातील काही जिल्हे वगळता अन्यत्र पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज आहे.
आज वातावरण कसे असेल?
मुंबईत आज ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. तर मुंबई उपनगरात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. आज मुंबईत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे. तर पुणे शहरात आज पाऊस ब्रेक घेणार आहे.