कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये धक्कादायक गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी एका लॉ कॉलेजमध्ये सामूहिक बलात्काराचा प्रकार समोर आला असतानाच, आता कोलकाता येथील प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) कॅम्पसमध्येच एका विद्यार्थिनीवर बलात्काराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नेमका प्रकार काय?
ही घटना शुक्रवारी (११ जुलै) घडली. आयआयएमच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची तक्रार हरिदेवपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बलात्कार झालेली विद्यार्थिनी आयआयएमची नसल्याचे समोर आले आहे.
पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, इंटर्नशिप आणि कौन्सिलिंगसाठी तिला मुलांच्या वसतिगृहात बोलावण्यात आले होते. त्यानुसार ती मुलांच्या वसतिगृहात आरोपी विद्यार्थ्याच्या खोलीत गेली. तिथे आरोपीने पिझ्झा आणि कोल्ड ड्रिंक मागवले. आरोपी थोड्या वेळासाठी खोलीतून बाहेर गेला असताना, तिने पिझ्झा खाल्ला आणि ती तिथेच बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिच्या लक्षात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले असून, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये अशा घटना वारंवार घडत असल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याआधी कसबा लॉ कॉलेजमध्येही एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती.