मुंबई: गेल्या १४ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. कामाला लागलेला प्रचंड विलंब आणि वाढणारा खर्च यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, गडकरींनी ठेकेदारांना 'नो एक्स्टेंशन'चा स्पष्ट इशारा दिला आहे. मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे सक्तीचे आदेश त्यांनी बजावले आहेत.
कोट्यवधींचा वाढीव खर्च, जनतेचा रोष कायम
या महामार्गाच्या रखडलेल्या कामांमुळे वाढीव खर्च २५० ते ३०० कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या १४ वर्षांपासून काम अपूर्ण असल्याने सरकारला विरोधक आणि जनतेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे केंद्रीय सार्वजनिक वाहतूक मंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री या राष्ट्रीय महामार्गाची वारंवार पाहणी करत आहेत.
डेडलाईन ठरल्या खोट्या, ठेकेदारांची मागणी फेटाळली
यापूर्वी अनेक डेडलाईन देण्यात आल्या होत्या, परंतु त्या सर्व खोट्या ठरल्या. विशेषतः, संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यातील दोन टप्प्यांचे काम वर्षानुवर्षे रखडले आहे. शासनाने अनेक ठेकेदार कंपन्या बदलल्या, पण काम काही पूर्ण झाले नाही. या दोन्ही टप्प्यांसाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी ठेकेदारांनी दिल्लीतील बैठकीत केली होती. मात्र, गडकरींनी ही मागणी ठामपणे फेटाळून लावली आणि त्या मुदतीतच काम पूर्ण करण्याचे कंपन्यांना आदेश दिले.
गडकरींच्या या कठोर भूमिकेनंतर आता मुंबई-गोवा महामार्गाचे अपूर्ण राहिलेले काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.