
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे
आपण अनेकदा समाजात, कुटुंबात, घरात बघतो की अगदी छोट्या छोट्या किरकोळ गोष्टी काही लोकं इतरांपासून लपवतात. विनाकारण अत्यंत साध्या, सोप्या विषयाला जटिल बनवून, संभ्रम निर्माण करणे, इतरांना सत्यापासून दूर ठेवणे यामध्ये काहीजण खूप पारंगत असतात. अगदी ते कुठे राहतात, काय करतात, कुठे जातात, कुठे येतात, कोणाला भेटतात हे सुद्धा इतरांना समजू देण त्यांना धोकेदायक वाटतं.
काही लोकं जी सतत गोष्टी लपवतात, माहिती इतरांपासून गुप्त ठेवतात, यामागे अनेक मानसशास्त्रीय कारणं असू शकतात, जी त्यांच्या स्वभाव, अनुभव आणि भीतीशी संबंधित असतात. यामागील प्रमुख कारणं आणि त्यावर संभाव्य उपाय काय असू शकतात यावर आपण आज चर्चा करणार आहोत. सतत गोष्टी लपवण्यामागील मानसशास्त्रीय कारण म्हणजे प्रामुख्याने अविश्वासाची भावना, भूतकाळात मिळालेले वाईट अनुभव, धोका किंवा फसवणूक. यामुळे लोकांचा इतरांवरील विश्वास कमी होतो. त्यांना असे वाटते की, जर त्यांनी माहिती उघड केली तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. यामुळे ते स्वतःला इतरांपासून दूर ठेवतात आणि कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ करतात.
शक्यतो ज्या लोकांनी काही चुकीचं काम केलेलं असतं किंवा त्यांना कोणीतरी सतत आपल्या मागवर आहे, शोधात आहे अशी भावना असते ती लोकं स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी वैयक्तिक माहिती लपवतात. काही लोकांना त्यांच्या जीवनात आणि आजूबाजूच्या परिस्थितीत पूर्ण नियंत्रण हवे असते. माहिती लपवून ते इतरांना त्यांच्यावर अवलंबून ठेवतात आणि परिस्थितीवर आपले नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांना सुरक्षित वाटते आणि त्यांची सत्ता टिकून राहते असे त्यांना वाटते. आपले सगळेच बारकावे लोकांना समजले तर लोक आपला गैरफायदा घेतील, आपल्याला त्रास देण्यासाठी या माहितीचा वापर करतील या भीतीने पण खरी माहिती
लपवली जाते.
जर त्यांनी काही गोष्टी उघड केल्या तर लोक त्यांना स्वीकारणार नाहीत किंवा त्यांचा तिरस्कार करतील अशी भीती त्यांना वाटते. अनेकदा लोकांकडून कोणत्याही स्वरूपाच्या काही गंभीर, अक्षम्य चुका झालेल्या असतात. या घटना इतरांना समजल्या तर नाव खराब होईल, आपण लोकांच्या नजरेतून उतरू या तणावामुळे सुद्धा माहिती लपवण्याचा कल वाढतो. त्यांना असे वाटते की, त्यांची माहिती उघड झाली तर त्यांच्यावर टीका केली जाईल किंवा त्यांना कमी लेखले जाईल. जर चुकीचं काम, फसवणूक, लबाडी, गुन्हा यांसारख्या घटनांमध्ये कोणीही गुंतलेला असेल तर त्याच्या मनात सातत्याने सामाजिक टीकेची भीती असते, म्हणून हे लोक अलिप्त राहण्यासाठी प्रयत्न करतात. या लोकांना असे वाटू शकते की, लोक त्यांना चुकीचे समजतील किंवा त्यांच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतील. आपण कितीही चांगलं वागू पण आपल्याला वाईट वागणूक मिळाली असेल तर लोक इतरांशी बोलणे टाळतात. जेणेकरून कोणताही गैरसमज नकोच.
माहिती उघड केल्याने त्यांना भावनिकरीत्या दुखावले जाईल असे वाटू शकते. या भीतीने ते स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी गोष्टी लपवतात. माहितीमधून आपले कमकुवत मुद्दे, आपल्यातील कमतरता जर इतरांना समजल्या तर हे लोक दुःखी होऊ शकतात म्हणून ते मनमोकळे बोलू शकत नाहीत. ज्या लोकांना स्वतःबद्दल कमी आत्मविश्वास असतो, त्यांना वाटते की ते पुरेसे चांगले नाहीत किंवा त्यांची माहिती महत्त्वाची नाही, यामुळे ते स्वतःला व्यक्त करण्यास कचरतात. यामुळे ते इतरांपासून दूर राहतात आणि त्यांच्या मनातले विचार किंवा भावना व्यक्त करत नाहीत. गोपनीयतेची सवय काहीवेळा फक्त एक सवय असते जी लहानपणापासून विकसित झालेली असते, जिथे त्यांना गोपनीयतेचे महत्त्व शिकवले जाते किंवा ते अशा वातावरणात वाढतात जिथे गोष्टी गुप्त ठेवल्या जातात. त्यांना असे वाटते की गोष्टी लपवणे ही एक सामान्य गोष्ट आहे आणि त्यामुळे काही फरक पडत नाही.
काही लोकांना त्यांच्या भावना किंवा विचार योग्य प्रकारे कसे व्यक्त करावे हेच कळत नाही. त्यांना संवाद साधण्यास किंवा स्वतःला उघड करण्यास त्रास होतो. यामुळे ते गोष्टी लपवून ठेवतात कारण त्यांना वाटते की हे व्यक्त करणे त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. अनेकदा या लोकांना योग्य पद्धतीने संवाद साधता न आल्यामुळे त्याचे रूपांतर वादात, भांडणात झालेले असते, मनं दुखावली गेलेली असतात. या करणास्तव अशी पुन्हा वृत्ती परत होऊ नये म्हणून बचाव करण्यासाठी हे लोक बोलणं, काही सांगणं बंद करून टाकतात. अशा स्वभावाच्या लोकांमुळे इतरांना मात्र खूप मानसिक त्रास आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. अशा व्यक्तींना मदत करण्यासाठी किंवा त्यांच्याशी योग्य संवाद साधण्यासाठी काही उपाय उपयुक्त ठरू शकतात. सर्वसामान्य लोकांना अनेकदा लपवा-छपवी, खोटं ऐकून त्रास होतो पण ते अशा लोकांसमोर हतबल होतात. आपल्याला जर अशा लोकांमध्ये बदल घडवायचा असेल, त्यांच्या सवई बदलायच्या असतील तर आपण काही उपाययोजना करू शकतो.
स्वतःबद्दल अशा व्यक्तींच्या मनात विश्वास निर्माण करा. त्यांच्याशी प्रामाणिक आणि सुसंगत राहा, त्यांना दिलेली वचनं पाळा, शब्द पाळा, त्यांच्या भावनांचा आदर करा आणि त्यांना सुरक्षित वातावरणाची हमी द्या. हळूहळू त्यांचा तुमच्यावरील विश्वास वाढू शकतो. लहान-लहान गोष्टींमध्ये त्यांचा विश्वास संपादन करा, जसे की वेळेवर त्यांच्या मदतीला पोहोचणे किंवा त्यांनी दिलेले काम पूर्ण करणे, त्यांनी काहीही सांगितल्यास ती माहिती आपल्या जवळच गुप्त ठेवणे. संवादाला प्रोत्साहन द्या. त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधा. त्यांना ऐकून घ्या आणि त्यांच्या मतांचा, विचारांचा आदर करा. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नका. ‘मला समजून घ्यायचं आहे की तुला काय वाटतं,’ अशा प्रकारे बोलून त्यांना व्यक्त होण्यास उद्युक्त करा, त्यांना मोकळ बोलता येईल असं वातावरण विश्वासात घेऊन तयार करा. सकारात्मक वातावरण निर्माण करा. त्यांना असे वाटले पाहिजे की ते तुमच्यासोबत सुरक्षित आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. त्यांची टीका करण्याऐवजी किंवा त्यांना कमी लेखण्याऐवजी, त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करा. त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करा आणि त्यांची प्रशंसा करा. तुमच्याबद्दल संशय, शंका मनात येईल असे अजिबात वागू नका.
सतत गोष्टी लपवण्याची सवय लगेच बदलत नाही. यासाठी वेळ लागतो आणि खूप संयम लागतो. त्यांना समजून घ्या आणि त्यांच्या बदलाच्या प्रक्रियेला पाठिंबा द्या. त्यांना लगेच उघड होण्यासाठी जबरदस्ती करू नका. त्यांना हळूहळू तुमच्यावर विश्वास ठेवू द्या. जबरदस्तीने कोणतीही माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करू नका, इतरांकडूनही त्या व्यक्तीबद्दलची माहिती मिळवण्यासाठी धडपड करू नका. जर ही समस्या खूप गंभीर असेल आणि त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत असेल, तर त्यांना समुपदेशकाची किंवा मानसशास्त्रज्ञाची मदत घेण्यास प्रोत्साहन द्या.
व्यावसायिक थेरपी त्यांना त्यांच्या भावनांशी सामना करण्यास आणि संवाद कौशल्ये सुधारण्यास मदत करू शकते. त्यांना समुपदेशकाकडे जाण्याचे फायदे समजावून सांगा आणि त्यांना मदत करण्यास तयार असल्याचे दर्शवा. जेव्हा अशी व्यक्ती काही गोष्टी लपवते, तेव्हा तुम्हाला निराशा किंवा राग येऊ शकतो. अशा वेळी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. शांत राहा आणि सकारात्मक प्रतिक्रिया द्या. त्यांच्या कृतींचा तुमच्यावर काय परिणाम होतो हे शांतपणे सांगा, पण आरोप करण्याऐवजी तुमच्या भावना व्यक्त करा. समोरील व्यक्ती खोटं बोलत आहे हे जरी तुम्हाला समजत असेल तरी त्याला त्यावरून घालून पाडून बोलू नका. या उपायांमुळे व्यक्तीला सुरक्षित वाटू शकते आणि त्या हळूहळू अधिक मोकळेपणाने संवाद साधू शकतात. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा आदर करणे आणि त्यांना स्वतःच्या गतीने बदलण्याची संधी देणे हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या बाजूने आपण जेवढे शक्य तेवढे प्रयत्न नक्कीच करू शकतो.
[email protected]