मिंडानाओ, फिलिपाइन्स: फिलिपाइन्सच्या मिंडानाओ बेटाजवळ शुक्रवारी ( पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटर (EMSC) नुसार, या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.
या शक्तिशाली भूकंपाच्या पार्श्वभूमीवर फिलिपाइन्समध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने (PTWC) सांगितले की, भूकंपाची तीव्रता आणि स्थानामुळे मिंडानाओच्या किनारी भागांसाठी, तसेच जवळील इंडोनेशिया, पलाऊ आणि मलेशियाच्या काही भागांसाठी त्सुनामीचा धोका संभवतो.
फिलिपाइन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड सिस्मोलॉजी (PHIVOLCS) या सरकारी संस्थेने मिंडानाओच्या सुरिगाओ डेल सुर आणि दावो ओरिएंटल प्रांतातील किनारपट्टीच्या रहिवाशांना तातडीने सुरक्षित आणि उंच ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे.
सध्या या भूकंपात झालेल्या जीवित वा वित्तहानीची त्वरित माहिती हाती आलेली नाही, परंतु भूकंपाची तीव्रता पाहता मोठ्या नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे. भूकंपाचे अनेक ‘आफ्टरशॉक्स’ (पुन्हा येणारे छोटे धक्के) जाणवण्याची भीतीही प्रशासनाने व्यक्त केली आहे.
फिलिपाइन्स हा देश भूगर्भीयदृष्ट्या 'पॅसिफिक रिंग ऑफ फायर' (Pacific Ring of Fire) या भूकंपप्रवण क्षेत्रात येतो, त्यामुळे येथे भूकंपाचे धक्के वारंवार जाणवतात. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.






