बचाव कृती समितीमधून संघटनांच्या माघारीस सुरुवात
मुंबई : राज्यातील अवजड वाहने, मालवाहतूकदार संघटनांनी संप सुरू केला असून या संपाला अपेक्षित व्यापकता न आलेली नाही. परिणामी, संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी वाशी येथे ५ जुलै रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व मालवाहतूकदार संघटनेच्या प्रमुखांना बोलवण्यात आले आहे.
जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर वाहतूक पोलीस, परिवहन विभागाकडून ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करीत आहेत. हे सर्व दंड माफ करण्यात यावेत, क्लिनरची सक्ती रद्द करावी, शहरातील अवजड वाहनांची येण्या-जाण्याच्या वेळांचा पुनर्विचार करावा, अशी मागणी राज्यातील मालवाहतूकदार संघटनांनी केली असल्याची माहिती वाहतूकदार प्रतिनिधी संजय ढवळे यांनी दिली. आहे. त्यानुसार, राज्यातील सर्व खासगी बस, मालवाहतूकदार आणि राजकीय पक्षांच्या वाहतूक संघटना एकत्र येऊन वाहतूकदार बचाव कृती समिती स्थापन केली होती; परंतु वाहतूकदार बचाव कृती समितीमधील एकेका संघटनेने माघार घेतली.
शालेय बस आणि खासगी बस संघटनांनी संप सुरू करण्याआधीच माघार घेतली. तसेच संप सुरू झाल्यापासून मुंबईतील जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवेचा पुरवठा होत असून, घाऊक बाजारात मालाची व्यवस्थित आवक होत आहे. परिणामी, राज्यस्तरीय चक्का जामबाबत ट्रक, टेम्पो, टँकर, ट्रेलर संघटनांचे प्रमुख व सदस्यांची बैठक नवी मुंबईतील वाशी येथे आयोजित करण्यात आली आहे.
न्हावा-शेवा येथील ७० टक्के वाहतूक सेवा शुक्रवारी बंद केली होती. तसेच, अहिल्यानगर, पुणे येथून भाजी, फळे, फुले घेऊन जाणारी वाहने बंद करण्यात येणार आहेत. तसेच वाशी बाजारातील वाहने बंद ठेवण्यासाठी ५ जुलै रोजी बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत संपाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे.
- डॉ. बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक व प्रतिनिधी महासंघ