ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी लक्ष्मण हाके आणि त्यांचे समर्थक थेट समुद्राच्या पाण्यात उतरले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोबत आणलेले बॅनर झळकवले. 'उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो' अशी घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलकांनी सरकारमधील ओबीसी नेत्यांचा आणि मंत्र्यांचाही निषेध केला.
राज्य सरकारकडून सारथी आणि बार्टी सारख्या योजनांना जेवढे अनुदान मिळते त्या तुलनेत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या महाज्योती योजनेला पुरेसे अनुदान मिळत नाही, असा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला. मागील तीन वर्षांपासून महाज्योती योजनेला सारथी आणि बार्टीच्या तुलनेत कमी महत्त्व दिले जात आहे, असाही आरोप विद्यार्थ्यांनी केला. सरकार दखल घेत नसल्यामुळे समुद्रात उतरुन आंदोलन करण्याची वेळ आली, असेही आंदोलक विद्यार्थी म्हणाले.