नवी दिल्ली : एक मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी आहे. चार खंड आणि दहाहून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेल्या ड्रग्ज गँगचा पर्दाफाश करण्यात आलाय. एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ही धडक करवाई केलीय. या कारवाईची दखल केंद्र सरकारनेही घेतलीय.
एनसीबीने अवैध ड्रग्ज व्यापाराविरोधात जागतिक पातळीवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केलीय. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या मुख्यालयातील ऑपरेशन्स युनिटने एका आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश केलाय. ही ड्रग्ज तस्कर एन्क्रिप्टेड डिजिटल प्लॅटफॉर्म्स, ड्रॉपशिपिंग मॉडेल आणि क्रिप्टो करन्सीचा वापर करत होते आणि हा अवैध ड्रग्ज तस्करीचा व्यापार चार खंडांमध्ये सुरू होता. या कारवाईत ८ जणांना अटक झालीय. पाच कन्साईमेन्ट जप्त करण्यात आल्या. इतकंच नव्हे तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही या अवैध नेटवर्कविरुद्ध मोठी कारवाई झालीय.
ही कारवाईची सुरुवात नवी दिल्लीतील बंगाली मार्केटपासून झाली. या मार्केटजवळ वाहन तपासत असताना त्यातील दोन व्यक्तींकडून ३ किलो ७०० ग्रॅम ट्रामाडोल गोळ्या जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे या दोन्ही व्यक्तींनी नोएडामधील एका प्रतिष्ठित खासगी विद्यापीठातून बी.फार्मा पदवी मिळवली होती. या दोघांची कसून चौकशी झाली आणि अवैध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांचे कारनामे उघड झाले.
हे दोघेही एका प्रमुख भारतीय बीटूबी प्लॅटफॉर्मवर विक्रेता प्रोफाईल चालवत होते. जिथून ते अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियामधील ग्राहकांना औषधांच्या गोळ्या विकत होते. त्यानंतर दिल्लीतील मयूर विहार येथे एका प्रमुख सहकाऱ्याला अटक झाली. या सहकाऱ्याने कर्नाटकातील उडुपी येथील एका ड्रग्ज व्यापाऱ्याची माहिती दिली. उड्डपी येथील ही व्यक्ती अमेरिकेसाठी ऑर्डर आणि शिपमेंटचं नियोजन करत होता. उडुपी येथे या सिंडिकेटचं कॉल सेंटर होतं. या ठिकाणी जवळपास १० कर्मचारी काम करत होते. यापैकी बऱ्याच जणांना या अवैध गतिविधींची माहिती नव्हती. एनसीबीने येथून ५० आंतरराष्ट्रीय कन्साईन्मेंटचा डेटा शोधून काढला. यामध्ये अमेरिकेत २९, ऑस्ट्रेलियात १८ आणि एस्टोनिया, स्पेन, स्वित्झर्लंडमधील प्रत्येकी एक कन्साईन्मेंटचा समावेश होता. ही माहिती इंटरपोलला देण्यात आली. त्यामुळे अमेरिकेतील अलबामामध्ये यूएस ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनने जोएल हॉलला अटक केली. तसंच त्याच्याकडून १७ हजारांहून अधिक नियंत्रित औषधांच्या साठा आणि ७०० ग्रॅम झोलपिडेम गोळ्या जप्त करण्यात आल्या. ऑस्ट्रेलियातही कार्यरत असलेलं ड्रग्जचं युनिट उद्ध्वस्त करण्यात आलं. ही ड्रग्ज टोळी टेलीग्राम प्लॅटफॉर्म्सवर काम करत होती.
क्रिप्टो करन्सी, पे पल आणि वेस्टर्न युनियनद्वारे आर्थिक व्यवहार केले जात होते. याशिवाय कुणालाही माहिती मिळू नये यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रॉप शिपर्सचा वापर केला जात होता. त्यानंतर डिजिटल फॉरेन्सिक तपासातून नवी दिल्ली आणि जयपूर येथून आणखी दोन भारतीयांना अटक झाली, जे लॉजिस्टिक्स आणि पुरवठ्याची कामं हाताळत होते. या नेटवर्कचा मास्टरमाईड यूएईमधून काम करत असल्याचं उघड झालंय. एनसीबी आता यूएई अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या कारवाईचं कौतुक केलंय. "एनसीबी आणि इतर तपास यंत्रणांनी अन्य देशांतल्या यंत्रणांशी कसा समन्वय साधायचा याचं उत्कृष्ट उदाहरण घालून दिलंय. आमच्या यंत्रणा क्रिप्टो पेमेंट्स आणि गुप्त ड्रॉप शिपर्ससारख्या पद्धतींवर सतत लक्ष ठेवून आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ड्रग कार्टेल्सविरुद्ध कठोर कारवाईचं धोरण स्वीकारलंय. या कारवाईद्वारे तरुण पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. एनसीबी आता अवैध ऑनलाईन फार्मन्सीच्या प्रचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही कारवाई केवळ एक यशस्वी ऑपरेशनच नाही, तर आंतरराष्ट्रीय समन्वय आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याचं उदाहरण आहे. ड्रग तस्करीसारख्या जागतिक समस्येला तोंड देण्यासाठी भारताची ही आघाडी निश्चितच कौतुकास्पद आहे.