'मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स' या निर्मिती संस्थेने, 'थिएटरऑन एंटरटेनमेंट' आणि 'पी एस डी जी स्टुडिओज प्रोडक्शन' यांच्या साथीने ‘एक तिची गोष्ट’ हे नाटक रंगमंचावर आणल आहे. ज्येष्ठ लेखक कै.मधुसूदन कालेलकर यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश चौधरी यांनी 'मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स' या निर्मिती संस्थेची स्थापना केली.संस्थेचे सदस्य परी तेलंग आणि शंतनू तेंडुलकर ह्यांच सहकार्य यासाठी लाभलं.
या सृजनशील कलाकृतीचे खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि त्यांची मुलगी आस्मा खामकर यांच्या संगीत, अभिनय, नृत्याची बहारदार अदाकारी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या दोघींसोबत अभिनेता ओंकार गोखले या नाटकात आहे.या नाटकाच लेखन अभिनेता विराजस कुलकर्णीने केलं आहे. सूरज पारसनीस, विराजस कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केले आहे.
'एक तिची गोष्ट' या नावावरूनच हे नाटक काहीतरी निराळं असणार याची कल्पना येत असली तरी त्याचे सादरीकरण नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण ठरलं आहे. 'एक तिची गोष्ट' च्या संपूर्ण टीमचं सध्या नाट्यरसिकांकडून कौतुक होत आहे. अचाट, अफाट उर्जा असलेल्या या नाटकाचा हा रंग उत्तरोत्तर असाच चढेल असं वाटत आहे.
आर्या आंबेकर, वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे यांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. संगीत निषाद गोलांब्रे याच आहे. चाळीशीतली अनया आणि तिच्या आयुष्यात आलेली एक किशोरवयीन मुलगी या दोघींच्या भावविश्वातून या नृत्यनाटिकेची कथा उलगडते.