मुंबई: नव्वदच्या दशकातील गाजलेली अभिनेत्री आणि 'रंगीला गर्ल' म्हणून ओळखली जाणारी उर्मिला मातोंडकर सध्या तिच्या सोशल मीडियावरील नव्या फोटोंमुळे जोरदार चर्चेत आहे. वयाच्या ५१ व्या वर्षी तिने केलेले अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते चकित झाले आहेत. तिचे गाल आत गेल्याचे आणि वजन कमी झाल्याचे पाहून अनेकांना प्रश्न पडले आहेत की, हे बदल नेमके कसे झाले?
गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, उर्मिला तिच्या फॅशन सेन्स आणि सोशल मीडियावरील सक्रियतेमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, अलीकडेच तिने शेअर केलेले फोटो पाहून तिच्या चाहत्यांना ती ओळखताही येत नाहीये, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
चेहऱ्यात बदल चर्चांचा
उर्मिलाच्या नव्या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्याची ठेवण पूर्वीपेक्षा वेगळी दिसत आहे. तिचे ओठ थोडे जाडसर, गालांवर सूज आणि संपूर्ण चेहरा अधिक ताणलेला वाटत आहे. काही चाहत्यांनी तर, "ही खरंच उर्मिला आहे का?" असा प्रश्न विचारला आहे. 'रंगीला' चित्रपटातील तिच्या नैसर्गिक सौंदर्याची आठवण करून देत, अनेक चाहत्यांनी तिला "आता ओळखूच येत नाही" असे म्हटले आहे.
सोशल मीडियावर सर्जरी, AI, आणि औषधांवरून तर्क-वितर्क
उर्मिलाच्या या बदललेल्या लूकमागे अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळे तर्क मांडले आहेत. काहींनी हे प्लास्टिक सर्जरीचे परिणाम असल्याचा संशय व्यक्त केला आहे, तर काहींना AI किंवा अति-एडिटिंगचा वापर असल्याचा अंदाज आहे. एका वापरकर्त्याने उपरोधिकपणे "१० जीबी एआय" वापरल्याची टिप्पणी केली. एका नेटकऱ्याने तर, "कृत्रिम सौंदर्याच्या मागे धावताना आणखी एक सुंदर चेहरा गमावला," अशी खंत व्यक्त केली.
वाढत्या वयाचे दडपण आणि सेलिब्रिटींचे सौंदर्य
उर्मिला आता ५१ वर्षांची असल्याने, तिच्या या ट्रान्सफॉर्मेशनमागे वाढते वय झाकण्याचा प्रयत्न दिसतो, असाही एक मतप्रवाह आहे. सेलिब्रिटींवर नेहमी तरुण आणि परिपूर्ण दिसण्याचे मोठे दडपण असते. यामुळे अनेक कलाकार वय लपवण्यासाठी सर्जरी, फिलर्स किंवा सौंदर्यप्रसाधनांचा अतिरेकी वापर करतात, असे मत व्यक्त होत आहे.
उर्मिलाने तिच्या फोटोंमध्ये स्केटर स्कर्ट आणि बेबी पिंक जॅकेट असा आधुनिक आणि फॅशन-फॉरवर्ड लूक केला आहे. तिच्या या फॅशनची अनेकांनी प्रशंसा केली असली, तरी तिच्या चेहऱ्यातील बदलांनी संपूर्ण लक्ष वेधून घेतले आहे. फॅशनऐवजी तिच्या ओठ आणि गालांमधील बदलच चर्चेचे मुख्य कारण बनले आहेत.